खरीप हंगामात कपाशीच्या पेऱ्यात यंदा 20 वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

गतवर्षी कापसाला चांगला भाव शासनाने दिला. अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही घरात आहे, असे असताना येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीच्या पेऱ्यात 20 टक्के वाढ होईल.

जळगाव ः जिल्ह्यात यंदा खरिपाच्या उत्पादनात कापूस पेरा 20 टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. मॉन्सूनपूर्व कपाशीही चांगली येईल. कपाशीला चांगला भावही राहील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. गतवर्षी 5 लाख 10 हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यंदा ती 25 लाख 25 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर होणार आहे. 

देशभरात कोरोना'चा लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच बंद आहे. शासनाने कृषी संबंधित सर्व सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी खरिपाची नांगरणी करून शेत मॉन्सूनपूर्व हंगामासाठी, मान्सूनसाठी तयारी करताना दिसत आहे. 

शेतकरी व शेती संबंधित सर्व दुकाने, माल विक्रीसाठी बाजार समित्या यांना लॉकडाऊनमधून सूट दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामातील गहू, दादर, ज्वारी, हरभरा विकण्यास सोईचे झाले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी खरिपाच्या तयारीही सुरू केली आहे. गतवर्षी कापसाला चांगला भाव शासनाने दिला. अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही घरात आहे, असे असताना येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीच्या पेऱ्यात 20 टक्के वाढ होईल. इतर पिकांपेक्षा कपाशीला चांगला भाव मिळाला आहे. 

बियाण्यांचे वाटप 25 मेस 
शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व कापूस हंगामाची तयारी केली असली तरी शेतकऱ्यांना बी.टी.बियाण्यांचे वाटप 25 मेस होणार आहे. यंदा 25 लाख 53 हजार बी.टी.बियाण्यांच्या पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांना खतेही मिळतील. 

गुलाबी बोंड अळीचा धोका 
जून 2019 मध्ये पाऊस चांगला झाल्याने अजूनही अनेक शेतामध्ये पाणी आहे. विहिरींना पाणी आहे. यामुळे शेतकरी मॉन्सूनपूर्व पेरणीकडे वळला आहे. असे असले तरी आता जर कापूस पेरला तर गुलाबी बोंड अळीचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी एक जूननंतरच करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर यांनी केले आहे. 

कृषी आयुक्त 21 ला घेणार आढावा 
कृषी हंगामाबाबत जिल्ह्याचा आढावा, बियाणे, खतांच्या मागणीबाबत 21 एप्रिलला पुणे येथील कृषी आयुक्त व्ही.सी.द्वारे माहिती घेणार आहे. खरीप हंगामाबाबत कर्ज, बियाणे, खते आदींचा आढावा ते घेतील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalagoan Cotton sowing increases by 20 this year during kharif season