esakal | जळगाव जिल्ह्यात 25 हजार बांधकाम कामगार लाभार्थी 
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात 25 हजार बांधकाम कामगार लाभार्थी 

केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात आर्थिक साहाय्य जाहीर केले असले तरी त्याबाबत स्पष्ट निर्देश अद्याप प्राप्त नाहीत. त्यासंबंधी आदेश, मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी ठरविता येतील. कामगार आयुक्त कार्यालयाकडे बांधकाम, घरेलू, सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांची नोंदणी आहे. 
- चंद्रकांत बिरार (सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव) 

जळगाव जिल्ह्यात 25 हजार बांधकाम कामगार लाभार्थी 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : "कोरोना'च्या संकटामुळे देशभरात 21 दिवसांचे "लॉकडाउन' जारी केल्यानंतर या काळात कुणीही उपाशी राहू नये, यासाठी केंद्र सरकारने "गरीब कल्याण पॅकेज'ची गुरुवारी घोषणा केली. त्यात बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांनाही मदत मिळणार असून, जळगाव जिल्ह्यात सुमारे 25 हजार कामगार नोंदणीकृत असल्याने ते या योजनेंतर्गत लाभार्थी ठरू शकतील. मात्र, जिल्ह्यात घरेलू, माथाडी व सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या कामगारांना ही मदत मिळेल की नाही, याबाबत अद्याप संभ्रम आहे. 


कोरोना विषाणूच्या संसर्गाने साऱ्या जगभरात थैमान घातले असून, भारतातही सर्वच राज्यांत या संसर्गजन्य रोगाने पाय पसरायला सुरवात केली आहे. भारतात सातशेवर कोरोना बाधित असून, 16 जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. एकट्या महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच आकडा शुक्रवारी 135च्या वर होता. या रोगाच्या जीवघेण्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधानांनी सुरवातीला 22 मार्चला "जनता कर्फ्यू' जाहीर केला, त्याला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. तर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून देशभरात "लॉकडाऊन' करण्यात आले. त्यामुळे आधीच अडचणीत असलेली अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. यात असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात भरडला जाणार असल्याने केंद्र सरकारने 26 मार्चला 1 लाख 70 हजार कोटींचे मोठे पॅकेज जाहीर केले. 

असंघटित कामगारांना मदत 
या पॅकेजअंतर्गत केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसह अनेक उपेक्षित घटकांना आर्थिक साहाय्य करणार आहे. असंघटित कामगारांमध्ये बांधकाम कामगार, घरेलू, माथाडी तसेच सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत कामगारांचा समावेश होता. मात्र, अद्यापतरी या आर्थिक साहाय्याचे लाभार्थी म्हणून बांधकाम कामगारांनाच गृहीत धरले जात आहे. 

जिल्ह्यात 25 हजार लाभार्थी 
जळगाव जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रात हजारोंच्या संख्येने कामगार कार्यरत आहेत. यात काही परप्रांतीय तर काही नोंदणी नसलेले कामगार आहेत. मात्र, ज्यांची नोंदणी आहे अशा कामगारांची संख्या जवळपास 25 हजार असून, त्यांना हे आर्थिक साहाय्य मिळू शकेल. राज्यांच्या महामंडळांकडे उपकराच्या माध्यमातून जमा झालेल्या 31 हजार कोटींच्या निधीतून त्यांनी बांधकाम कामगारांना मदत करावी, असे केंद्राचे निर्देश आहेत. 

अन्य कामगारांचे काय? 
या पॅकेजअंतर्गत अन्य असंघटित कामगारांबाबत उल्लेख नाही. त्यात घरेलू, सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश होता. जळगाव जिल्ह्यात घरेलू कामगारांची संख्या 15 हजार 400 आहे. माथाडी कामगारांची संख्या 4 हजार ही नोंदणीकृत असली तरी प्रत्यक्षात 1950 कामगार कार्यरत आहेत. तर सुरक्षारक्षक म्हणून 750 जणांची नोंदणी असली तरी 550 रक्षकच कार्यरत आहेत. याशिवाय विविध दुकान, प्रतिष्ठानांमध्येही मजूर, कामगार कार्यरत असतात. त्यांची नोंदणी नाही. त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल का नाही, याबाबत संभ्रम आहे. 

अनेक कामगार, मजूर व विविध संस्था, कंपनी, दुकानांमध्ये कार्यरत कामगारांची नोंदणी नाही. त्यांना मदत मिळण्याबाबत संभ्रम आहे. प्रत्येक क्षेत्रात कार्यरत कामगार, मजूर, कर्मचाऱ्याने संबंधित मंडळ, संस्थेत नोंदणी करणे गरजेचे आहे. 
- जमील देशपांडे 

जळगाव जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगार 
बांधकाम क्षेत्र : 25 हजार 
घरेलू कामगार : 15,400 
माथाडी कामगार : 4000 (प्रत्यक्ष 1950 कार्यरत) 
सुरक्षारक्षक : 750 (प्रत्यक्ष 550 कार्यरत) 
 

loading image