ऐंशीवर्षीय "तरुणा'ची ऊर्जादायी दिनचर्या; रोज 25 किलोमीटर सायकलिंग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

रोज 25 किलोमीटरची सायकलिंग आणि सहा- सात तास पिठाच्या गिरणीवर काम... तरीही थकवा शरीराला शिवत नाही. वयाच्या ऐंशीतही त्याच्या पायाची, सायकलीची आणि ते काम करीत असलेल्या गिरणीची चाके अद्याप ना थांबली... ना थकली... 

जळगाव : वय वर्षे 80... पण, तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा आहे शरीरात. वयोमानानुसार कानाने ऐकायला थोडं कमी येतं. पण, या वयात नखातही दुखणं नाही, अशी देहयष्टी. रोज 25 किलोमीटरची सायकलिंग आणि सहा- सात तास पिठाच्या गिरणीवर काम... तरीही थकवा शरीराला शिवत नाही. वयाच्या ऐंशीतही त्याच्या पायाची, सायकलीची आणि ते काम करीत असलेल्या गिरणीची चाके अद्याप ना थांबली... ना थकली... 

लक्ष्मीनारायण मालू असे त्यांचे नाव. "मालूशेठ' म्हणून त्यांची समाजात ओळख. मूळचे धरणगाव तालुक्‍यातील देवगुण- पिंप्री येथील मूळ रहिवासी. "बीएसएनएल'च्या नोकरीत मन रमले नाही म्हणून राजीनामा देऊन त्यांनी जळगावमध्ये शिवाजीनगर परिसरातील खडकेचाळमध्ये पिठाची गिरणी सुरू केली. 1970 पासून मालूशेठ गिरणी स्वत: चालवितात. गिरणीचे काम करताना दिवस सरत गेले, वय वाढत गेले, परिस्थिती बदलत गेली. पण, मालूशेठ यांच्यातील ऊर्जा काही कमी झाली नाही. 

रोज 25 कि.मी. सायकलिंग 
1988 मध्ये लक्ष्मीनारायण मालू कुटुंबासह शिवाजीनगरातील निवास सोडून महाबळ परिसरातील चैत्रबन कॉलनीत येऊन स्थायिक झाले. वयाने चाळिशी पार केलेली. तरीही त्यांनी गिरणीची चाके थांबवली नाहीत. त्यावेळी त्यांच्याकडे स्कूटर होती, त्या स्कूटरवरून गिरणीवर जात. नंतर स्कूटर बाजूला करत त्यांनी दररोज सायकलीवर जाऊन गिरणीचे काम पाहण्यास सुरवात केली. गेल्या 25 वर्षांपासून ते गिरणीवर रोज दोन वेळा जातात. सकाळी आठला जाऊन दुपारी साडेबाराला परत आणि दुपारी साडेतीनला जाऊन सायंकाळी साडेसातला परत येतात. अशाप्रकारे चार फेऱ्यांद्वारे त्यांची 24 ते 25 किलोमीटरची सायकलिंग रोज होतेय. 
 
अशी आहे दिनचर्या 
मालूशेठ यांची दिनचर्या ठरलेली. त्यात बदल होत नाही. पहाटे साडेचारला उठून अंगण झाडणे, साफसफाई करून घरातील दुकाने सुरू करणे, आठला त्यांची सायकल शिवाजीनगरची वाट धरते. दुपारचे जेवण साडेबाराला, रात्रीचे आठला. जेवण, झोपेचे वेळापत्रक ठरलेले. त्यामुळे आजही तरुणांना लाजवेल अशी त्यांच्यात ऊर्जा आहे. 

365 दिवस गिरणी सुरू 
वर्षातील 365 दिवस त्यांची गिरणी सुरू असते. केवळ दर शनिवारी ते गिरणीवर अर्धा दिवस काम करतात. शनिवारच्या अर्ध्या वेळेत समाजात जाणे, नातलगांना भेटणे, दुसऱ्या मुलाकडे जाणे, काही कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थिती, असा त्यांचा जीवनक्रम. सध्या "लॉकडाउन'चा काळ असला, तरी अत्यावश्‍यक सेवा म्हणून गिरणी सुरू आहे. स्वत: मास्क लावूनच ते सध्या घराबाहेर निघतात. गिरणीवरही योग्य काळजी घेऊनच दळणाचे काम सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 80 years youngs dily inspiration movement