जळगाव आकाशवाणी पोचली "ऍप'वर! 

जळगाव आकाशवाणी पोचली "ऍप'वर! 

जळगाव : "आकाशवाणीचे हे जळगाव केंद्र आहे..' हे मधुर आवाजातील बोल ऐकण्यासाठी श्रोत्यांना आता रेडिओची गरज नाही... "एफएम'च्या धर्तीवर मोबाईलच्या एका क्‍लिकवर जळगाव आकाशवाणीचे कार्यक्रम श्रोत्यांना ऐकता येणार आहेत. त्यासाठी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून 20 ऑगस्टपासून ही सेवा सुरू होऊन श्रोत्यांना ते मोठे "गिफ्ट' ठरलेय.. 
बदलत्या तंत्रज्ञानाचा ठाव घेत प्रसार भारतीनेही आपल्या प्रसारण क्षेत्रात बदल करत श्रोत्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संकल्प केला आहे. आकाशवाणीचे विविध भाषांमधील प्रसारण केंद्र "एअर रेडिओ'द्वारे कनेक्‍ट करण्यात आले आहेत. विविध भारती, एफएम रेनबो, रागम, रेडिओ काश्‍मीर यासह जवळपास शंभरावर केंद्रांचा यात समावेश आहे. या यादीत आता जळगाव आकाशवाणी केंद्राचाही समावेश झाला आहे. 

मोबाईलवर सेवा उपलब्ध 
आतापर्यंत आकाशवाणी, जळगाव केंद्रावरील कार्यक्रम ऐकायचे असतील तर ते रेडिओद्वारेच ऐकायला मिळत होते. मात्र, "एअर रेडिओ'द्वारे आता हे कार्यक्रम "स्मार्ट फोन'वरही ऐकायला मिळणार आहेत. "एफएम'च्या धर्तीवर हे तंत्रज्ञान विकसित करून ते नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रात अपडेटेड व्हर्जन असलेला कॉम्प्युटर व संबंधित यंत्रणा बसविण्यात आली आहे. 

श्रोत्यांसाठी सुविधा 
माहितीच्या खजिन्यासह मनोरंजनाचे साधन बनलेल्या "स्मार्ट' फोनवर आता आकाशवाणीच्या पारंपरिक श्रोत्यांचीही या यंत्रणेच्या माध्यमातून मोठी सुविधा झाली आहे. आकाशवाणी केंद्रावरून पहाटेपासून ध्वनीक्षेपित होणाऱ्या पहिल्या कार्यक्रमापासून रात्रीपर्यंतचे सर्व कार्यक्रम त्यावर श्रोत्यांना ऐकता येतील. 20 ऑगस्टपासून ही सुविधा कार्यान्वित झाली आहे. 

"एअर रेडिओ' असा ऐकाल 
आपल्या स्मार्ट फोनवर जळगाव आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी "प्ले स्टोअर'मधून "news on air' ही ऍप डाऊनलोड करा. त्यात भाषांच्या पर्यायातून मराठी हा पर्याय निवडून रेडिओच्या लोगोवर क्‍लिक करावे. देशभरातील विविध केंद्रांच्या यादीत सर्वांत खाली "एअर जळगाव'च्या चौकटीवर क्‍लिक केल्यास जळगाव आकाशवाणी केंद्रावरून ध्वनीक्षेपित होणारे कार्यक्रम श्रोत्यांना ऐकता येतील. 


आकाशवाणीचे नियमित श्रोते आजही कार्यक्रमांना पसंती देतात. मात्र, मोबाईलचे साम्राज्य झाल्याने या श्रोत्यांनाही एका क्‍लिकवर हे कार्यक्रम हवे असतात. म्हणून तंत्रज्ञानातील बदल स्वीकारत आकाशवाणी "स्मार्ट' झालीय. श्रोते वाढण्यासही या सुविधेची मदत होईल. 
- ज्ञानेश्‍वर बोबडे, कार्यक्रम अधिकारी, युवावाणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com