डोळ्यासमोर बहिणेचे झाले अपहरण.. अन्‌ चार जिल्ह्यातील पोलिस उतरले महामार्गावर !

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

नशिराबाद गावाजवळ महामार्गावर पोलिस गाडी असल्याचे सांगत तिच्या भावाला चालत थोडा पुढे जा, पुढून गाडीवर बसवतो असे सांगत भावाला सोडून लहान बहिणीस घेऊन दुचाकीस्वार दुपारी चार वाजता पसार झालेला होता

जळगाव, : मुलुंड (मुंबई) येथे मजुरीसाठी गेलेल्या अकोल्यातील कुटुंबीय लॉकडाऊनमुळे जळगाव मार्गे पायी प्रवास करीत होते. मंगळवारी (ता.19) या कुटुंबातील 13 वर्षीय मुलगी दुचाकीस्वाराने मदत करण्याच्या बहाण्याने पळवून नेली होती. मात्र, जळगाव ते अकोला महामार्गावर सर्व पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याने मुलीस ट्रकचालकाच्या स्वाधीन करून दुचाकीस्वार भामट्याने पळ काढला आहे. या मुलीसाठी चक्क चार जिल्ह्यांचे पोलिस महामार्गावर शोधकार्यात उतरले होते. मुलगी सापडताच सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. संशयिताचा शोध सुरू आहे. 

मुलीला पळवून नेणाऱ्याचे नाव गणेश सखाराम बांगर (वय-32 रा. वाशीम, मालेगाव) असे असून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शानात रात्रीपासून स्थानिक गुन्हेशाखेसह जळगाव ते अकोलापर्यंत पोलिस पथके मुलीच्या शोधार्थ तैनात करण्यात आली होती. संशयितास त्याची चाहूल लागल्याने पीडितेला त्याने अमरावतीजवळ सोडून पळ काढला. अमरावती पोलिसांनी सकाळी साडेअकरा वाजता मुलीस ताब्यात घेत रीतसर घटनेची माहिती जळगाव पोलिसांना कळवली असून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन ती सुखरूप असल्याचे अमरावती पोलिसांनी कळवले आहे. 

असा घडला प्रकार 
नशिराबाद पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात नमूद केल्याप्रमाणे, सिसामाता अकोला येथील रहिवासी कुटुंबीय मुलुंड (मुंबई) येथे मजुरीच्या कामासाठी स्थायिक होते. लॉकडाऊनच्या चौथ्या पर्वात सर्वच मजूर आपापल्या घराकडे निघाले असल्याने अकोल्यातील हे कुटुंबीय देखील पायीच इतरा सोबत गावाच्या दिशेने निघाले होते. जळगाव शहरात कालिंकामाता मंदिर परिसरात दुपारचे जेवण घेतल्यानंतर सावलीत पहुडले असताना एक दुचाकीस्वार त्याच्याकडे आला. आपणही अकोला येथे जात असल्याचे सांगत त्याने मदतीचा बहाणा करून अजय (नाव काल्पनिक) व त्याची तेरा वर्षीय बहीण सपना (नाव काल्पनिक) अशा दोघांना दुचाकीवर बसविले. नशिराबाद गावाजवळ महामार्गावर पोलिस गाडी असल्याचे सांगत तिच्या भावाला चालत थोडा पुढे जा, पुढून गाडीवर बसवतो असे सांगत भावाला सोडून लहान बहिणीस घेऊन दुचाकीस्वार दुपारी चार वाजता पसार झालेला होता. पायी चालत अजय भुसावळपर्यंत पोचला मात्र, त्यास तो दुचाकीस्वार आणि त्याची बहीण मिळून आली नाही. म्हणून त्याने भुसावळ पोलिसांत तक्रार दिली. घटना नशिराबाद पोलिस ठाण्याची असल्याने नशिराबाद पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

रात्रभर पोलिस रस्त्यावर 
घडल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, डीवायएसपी गजानन राठोड, गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रोहोम, सहाय्यक निरीक्षक प्रवीण साळुंखे याचा शोध सुरू केला भुसावळ जवळ फेकरी टोल नाक्‍यावर संशयित सीसीटीव्हीत कैद झाल्यावर संशयिताचे छायाचित्र सर्वत्र व्हायरल करण्यात आले. रात्रीतून नाशिक ग्रामीण येथून संशयिताची संपूर्ण कुंडली संकलित करण्यात येऊन तो अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर आल्यावर अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव अशा चार जिल्ह्यातील पोलिस काल रात्रीपासून महामार्गावर शोधकार्य राबवत होते. त्यासाठी प्रत्येक दहा किलोमीटरवर नाकाबंदी लावण्यात येऊन पोलिसांचे शोध कार्य सुरू होते. 

ट्रकचालकाच्या स्वाधीन करून पसार 
गणेश बांगर हा मुळातच अट्टल गुन्हेगार असून महामार्गावर पोलिसांच्या कसरती वाढल्याची चुणूक त्याला लागली. तत्काळ त्याने अमरावती शहरा जवळील लोणी गावा जवळ मजुरांना घेऊन जाणारा ट्रक थांबवून पुढे शहरापर्यंत या मुलीला सोडा असे सांगून दुचाकीवर तो, पसार झाला होता. ट्रक चालकाने या मुलीस आस्थेवाईक चौकशी केल्यावर तिने हकीकत सांगितल्यावर ट्रक चालकाने तिला जवळच्या पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती लोणी पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बाळकृष्ण रंधे यांनी जळगावी कळवली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Abduction of thirteen-year-old girl; After the police fielding, the villain left the road and passed