नववधूचे माहेरच हिरावले....जिथे लागले लग्न तिथूनच निघाल्या अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

मुलीला मनाप्रमाणे सासर मिळाले, याचा मनस्वी आनंद वडील प्रभाकर चौधरी आणि आई प्रभाबाई चौधरी यांना होता. लहान भाऊ सुख्या होवून बहिणीच्या लग्नात मिरला. मंजुश्रीला सासरी पाठवून तिच्या लग्नाचा स्वागत समारंभाचा (रिसेप्शन) कार्यक्रम चोपडा येथे झाल्यानंतर घरी परतताना चेहऱ्यावर तो आनंदच अजूनही होताच. तोच रात्री साडेअकराच्या सुमारास या मंडळीवर काळाने झडप घातली. 

जळगाव : आपल्या मुलीला चांगला मुलगा शोधून तिचा संसार सुखी करण्याचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात उतरवून मुलीला संसाराला लावण्याचे काम माता- पित्याने केले. दोन दिवसांपुर्वी धुमधडाक्‍यात पार पडलेल्या सोहळ्यात मंजुश्रीने संसाराची सुरवात करण्यासाठी सासरचा उंबरठा ओलांडलाच होता..पण आपल्या जोडीदारासोबत माहेरी जाण्यापुर्वीच नियतीने मंजुश्रीचे माहेर हिरावून घेतले. यामुळे एकीकडे आनंदाचा क्षण संपत नाही; तोच आई- वडील आणि भाऊच्या मृत्यूने दुःखाचा डोंगर उभा राहिला. 

नक्‍की पहा - मुलीच्या विवाहाचा आनंद क्षणात विरला...कुटूंबातील दहा जणांवर काळाचा घाला 

चिंचोल (ता. मक्ताईनगर) येथील नवविवाहित मंजुश्री हिचे लग्न 30 जानेवारीला धुमधडाक्‍यात लावून दिले. आपल्या मुलीला मनाप्रमाणे सासर मिळाले, याचा मनस्वी आनंद वडील प्रभाकर चौधरी आणि आई प्रभाबाई चौधरी यांना होता. लहान भाऊ सुख्या होवून बहिणीच्या लग्नात मिरला. मंजुश्रीला सासरी पाठवून तिच्या लग्नाचा स्वागत समारंभाचा (रिसेप्शन) कार्यक्रम चोपडा येथे झाल्यानंतर घरी परतताना चेहऱ्यावर तो आनंदच अजूनही होताच. तोच रात्री साडेअकराच्या सुमारास या मंडळीवर काळाने झडप घातली. 

आशिर्वाद ठरला शेवटचा 
हिंगोणे (ता.यावल) येथे रात्री झालेल्या अपघातात स्वागत समारंभ संपवून घराकडे परतणाऱ्या वऱ्हाडाच्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. यात नववधू मंजुश्रीचे वडील प्रभाकर चौधरी, आई प्रभाबाई चौधरी आणि भाऊ शिवम चौधरी यांच्यासह बारा जणांचा जागीच मृत्यू झाला. पण स्वागत समारंभात मुलीला आशिर्वाद देवून आई- वडीलांना तिचा निरोप घेतला. यावेळी मंजुश्रीने आई- वडीलांचा आशिर्वाद घेतला. हा आशिर्वाद तिच्यासाठी शेवटचाच ठरला. 

जिथे लागले लग्न तिथून अंत्ययात्रा 
मंजुश्रीचा हिचा विवाह 30 जानेवारीला चिंचोल येथे घरासमोर पार पडला. तिन दिवसांपुर्वी या सोहळ्यात अगदी रूबाबत फिरणारे माय- बाप आत तिला दिसेनासे झाले. ज्या घरापुढे पडलेला मंडप निघाला नाही तोच तिघांची अंत्ययात्रा काढण्यासाठी दुसरा मंडप टाकण्याची वेळ नातेवाईकांवर आले होते. म्हणजे जिथे लग्नसोहळा पाहिला; त्याच ठिकाणी आक्रोश आणि अश्रूंच्या धारा पाहण्यास मिळाल्या. पण ज्या हातांनी लग्नात कन्यादान केले, त्यांची शेवटची सेवा करण्याची वेळ नववधू मंजुश्रीवर आली. हे सारे हृदय पिळवून टाकणारे चित्र चिंचोले येथे पाहण्यास मिळाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon accident doughter weading house mother father death