बाफना नेत्रपेढीचे कार्य...दोन दशकांत पाचशेवर जणांचे नेत्रदान 

अमोल महाजन
गुरुवार, 19 मार्च 2020

जळगाव : "परी नेत्ररूपी उरावे' असा संदेश घेऊन सुरू असलेल्या नेत्रदान चळवळीबाबत मांगीलाल बाफना नेत्रपेढीतर्फे जनजागृती करण्याचे कार्य वीस वर्षांपासून निरंतर सुरू आहे. यामुळे आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी अन्य कुणाला तरी दृष्टी लाभावी, असा विचार करून अनेकजण आता नेत्रदानाचा संकल्प करताना दिसतात, तर काहींमध्ये आजही नेत्रदान करण्याबाबत अनास्था पाहावयास मिळते. 

जळगाव : "परी नेत्ररूपी उरावे' असा संदेश घेऊन सुरू असलेल्या नेत्रदान चळवळीबाबत मांगीलाल बाफना नेत्रपेढीतर्फे जनजागृती करण्याचे कार्य वीस वर्षांपासून निरंतर सुरू आहे. यामुळे आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी अन्य कुणाला तरी दृष्टी लाभावी, असा विचार करून अनेकजण आता नेत्रदानाचा संकल्प करताना दिसतात, तर काहींमध्ये आजही नेत्रदान करण्याबाबत अनास्था पाहावयास मिळते. 

केशवस्मृती प्रतिष्ठान व आर. सी. बाफना फाउंडेशन ट्रस्ट संचालित मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयाच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांपासून नेत्रदान चळवळ राबविली जात आहे. नेत्रपेढीमध्ये आतापर्यंत 518 लोकांनी नेत्रदान केले असून 238 लोकांवर नेत्ररोपणाची मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बाफना नेत्रपेढीतर्फे नेत्रदानाविषयी समाजात माहिती देऊन नेत्रदानास उद्युक्त करणे, नेत्रदान घेणे व त्या डोळ्यांचा उपयोग अंधांना नवीन दृष्टी प्राप्त करुन देण्यासाठी शस्त्रक्रिया करणे या सर्व सुविधा अगदी मोफत केल्या जात आहेत. नेत्रपेढीत मिळालेले डोळे हैदराबादहून मागविलेल्या विशिष्ट केमिकलमध्ये साठवून ठेवले जातात व ते 96 तासांपर्यंत नेत्रपेढीत गरजू रूग्ण आल्यास नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येते. मात्र 4 दिवसांनी ते डोळे गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी देण्यात येत असतात. बाफना नेत्रपेढीच्या नेत्रदान जनजागृती चळवळीस नेत्ररोपणतज्ज्ञ डॉ. स्वप्नील कोठारी, डॉ. धीरज बडाले, व्यवस्थापक राजश्री डोल्हारे, आयबॅंक टेक्‍निशियन समाधान चौधरी यांचे सहकार्य लाभत आहे. 

मृत्यूनंतर 4 ते 6 तासांत नेत्रदान आवश्‍यक 
नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर माणसाच्या डोळ्यातील काळ्या बुबुळाची वरच्या जाडीची चकती (कॉर्निया) काढून ती अंध व्यक्तीला बसवणे. नेत्रदानात संपूर्ण डोळा काढला जात नाही. हे मृत्यूनंतर 4 ते 6 तासांत करणे आवश्‍यक असते. मृत व्यक्तीची संमती घेतली नसली तरी केवळ नातेवाइकांच्या संमतीने नेत्रदान करता येते. नेत्रदानात डोळे कधीही विकले जात नाहीत ते मोफत बसवले जातात. परंतु, शस्त्रक्रियेनंतरचा येणारा खर्च रूग्णांना स्वतः करावा लागतो. डोळ्यातील काळ्या बुबुळाला विविध कारणांनी इजा होते, फुल पडते, पांढरे पडते अशा केसेसमध्ये नेत्रदानाचा उपयोग होतो. 

नेत्रदानाबाबत गैरसमज 
जनमानसात असलेले गैरसमज कमी नेत्रदानाला कारणीभूत आहेत. नेत्रदान केल्यावर चेहरा विद्रूप होतो, पुढल्या जन्मी आंधळेपणा येतो, मृत व्यक्तीची शरीराची विटंबना होते आदी गैरसमज समाजात पसरविले जातात. 

बाफना नेत्रपेढीचे कार्य 
मांगीलाल बाफना नेत्रपेढी (आय बॅंक) ही एक समाजसेवी संस्था असून, ती नेत्रदान केले असल्यास मरणोत्तर डोळे काढून घेते व त्यांची जपणूक करून गरजू रुग्णांना डोळे उपलब्ध करून देते. नेत्रदाता व गरजू रुग्ण यांची सूची तयार करणे, संपर्क साधणे, नेत्रदान घडवून आणणे व मिळालेल्या डोळ्यांचा सांभाळ करणे व ते गरजूंना उपलब्ध करून देणे, नेत्रदानाबाबत चळवळ चालवणे आदी कार्य या संस्थेत केली जातात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon afana Eye Bank's work ... donates over five hundred people in two decades