लॉकडाउन'ने सिझन खाल्ला; आता ऑनलाइन शॉपिंगनंतर हवी परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 एप्रिल 2020

एक महिन्याच्या "लॉकडाउन'ने सिझन खाल्ला असला, तरी शासनाने आता ऑनलाइन शॉपिंगला परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने दुकान उघडण्यासही परवानगी मिळावी,.

जळगाव ः इलेक्‍ट्रॉनिक्‍स मार्केटचा सिझन हा उत्सवकाळात अधिक चालतो. अर्थात उन्हाळ्यात लग्नसराई आणि एसी, कूलरची अधिक मागणी होते. त्यामुळे मार्च, एप्रिलमध्ये मोठी उलाढाल असते. यादृष्टीने सर्वच दुकानचालकांनी नेहमीप्रमाणे नवीन माल भरून ठेवलेला होता. मात्र, त्यानंतर लागलीच "लॉकडाउन' सुरू झाल्याने माल तसाच पडून आहे. एक महिन्याच्या "लॉकडाउन'ने सिझन खाल्ला असला, तरी शासनाने आता ऑनलाइन शॉपिंगला परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने दुकान उघडण्यासही परवानगी मिळावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानचालकांनी व्यक्‍त केली. 

थोडीफार शिथिलता व्हावी 
उन्हाळा म्हणजे इलेक्‍ट्रॉनिक्‍स मार्केटसाठी सिझन असतो. यादृष्टीने सर्वच दुकानचालकांनी माल भरून ठेवलेला आहे. पण गेल्या महिनाभरापासून "लॉकडाउन'मुळे व्यवसायावर परिणाम झाला असून, जिल्ह्यात नाही म्हटले तरी 80 ते 90 कोटींचा व्यवसाय ठप्प आहे. 20 एप्रिलपासून शिथील करण्याचे बोलले जात असून, त्याची वाट पाहत असून, तसा निर्णय झाल्यास थोडा दिलासा मिळेल. शिवाय ईएमआय भरण्यास तीन महिन्यांची मुदत दिल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी चांगली झाल्यास व्यावसायिकांना चांगले राहील. 
- कौशल जोशी, संचालक, जोशी सेल्स 

ऑनलाइन पोर्टलप्रमाणे परवानगी हवी 
"लॉकडाउन'मुळे व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. खरेदी-विक्रीचे सर्वच व्यवहार ठप्प झाले असून, त्यात खर्च मात्र सुरूच आहे. आता शासनाने ऑनलाइन शॉपिंग पोर्टलला परवानी दिल्याने याचा परिणाम इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू विक्री होणार आहे. ग्राहकांकडून ऑनलाइन पोर्टलद्वारे वस्तू खरेदी केल्याने स्थानिक इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानदारांना याची झळ सहन करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाकडून कुठलीही मदत तर मिळत नाही. ऑनलाइन शॉपिंग पोर्टलला परवानगी दिल्याने आमचे नुकसानच केले जात आहे. यासाठी आम्हालाही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. 
राकेश संगथानी, पूजा इलेक्‍ट्रॉनिक्‍स, भुसावळ 

उदरनिवार्हाचा प्रश्‍न गंभीर 
गेल्या 24 मार्चपासून "लॉकडाउन'मुळे दुकान बंद आहे. अनेक घरांची इलेक्‍ट्रॉनिक्‍सची कामे होती. मात्र ती बंद करण्यात आली. सध्या उन्हाळा सुरू असून कूलरला मोठी मागणी आहे. मात्र, दुकान बंद असल्याने कूलर विकता येत नाही. आमच्यासाठी हा सिझन असतो. हाताला काम नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शासनाने आम्हाला दुकान उघडण्याची परवानगी द्यावी. 
 राहुल चौधरी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्यावसायिक, अमळनेर 

तीन महिन्यांचे व्याज माफ व्हावे 
दोन वर्षांपासून व्यापाऱ्यांना आर्थिक मंदीची झळ सहन करावी लागत आहे. आता कुठे मार्केट स्थिरस्थावर होऊ पाहत होते, तेवढ्यात "कोरोना'मुळे देशभरात "लॉकडाउन' करण्यात आले. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू विक्रेत्यांचे कंबरडेच मोडले आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची विक्री विशेषत: सणासुदीतच अधिक होते. गुडीपाडवा गेला आणि आता अक्षय्यतृतीया येत आहे, यासाठी बॅंकेकडून कर्ज घेऊन माल भरला. मात्र, "लॉकडाउन'मुळे शोरूम बंदच असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यात खर्च सुरूच असून, बॅंकांचे हप्ते, कामगारांचे पगार द्यावे लागतात. त्यामुळे शासनाने किमान तीन महिन्यांचे व्याज माफ केल्यास दिलासा मिळू शकतो. 
 नंदलाल मकडीया, संचालक, डिस्को इलेक्‍ट्रॉनिक्‍स, भुसावळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Allowed online shopping now