जळगाव जिल्ह्यातील उद्योगांवर माल वाहतुकीचे संकट; काय आहे कारण वाचा...

चेतन चौधरी
गुरुवार, 30 एप्रिल 2020

रेल्वेने भाडेवाढ केल्याने येथील यार्ड बंद करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. याचा परिणाम उद्योग आणि शेतमाल वाहतुकीवर होईल. आयात-निर्यातीसाठी सहा महिन्यांपासून परवाने घ्यावे लागतात. ॲडव्हान्स रक्कम देऊन बुकींग करावी लागते. मात्र, कॉनकोर ने तडकाफडकी यार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला असून, नोंदणी केलेले माल आणणे शक्य नसल्याने खुप मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. 
- डी. आय. देसरडा, उपाध्यक्ष जैन इरिगेशन, जळगाव

भुसावळ : भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन स्थानक असल्यामुळे औद्योगिक तसेच शेतमाल आयात-निर्यातीसाठी सोयीचे ठिकाण आहे. त्यादृष्टीने येथील कंटेनर यार्डातून देशभरात मालवाहतूक केली जाते. मात्र रेल्वेने केलेली जागेची भाडेवाढ परवडेनाशी नसल्याने यार्ड बंद करण्याचा धक्कादायक निर्णय ‘कॉनकोर’ ने घेतला असून, याचा परिणाम आयात निर्यातीवर होऊन तब्बल १७०० कोटींचे नुकसान होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील उद्योजक आणि शेतकऱ्यांना मालाच्या आयात-निर्यातीसाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 
औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने आयात-निर्यातीची साधने महत्वपूर्ण ठरतात. त्यादृष्टीने भुसावळ येथे रेल्वे जंक्शन असल्याने कंटेनर यार्डातून मालवाहतुक केली जाते. भुसावळात रेल्वेच्या जागेवर कंटेनर यार्ड असून, याठिकाणी ५०० कंटेनर्स आहेत. दररोज १५ कंटेनरद्वारे माल वाहतुक करुन, वर्षाला ४५०० कंटेनर्सद्वारे मालाची निर्यात तर १००० कंटेनर्सद्वारे आयात केली जाते. यातून ‘कॉनकोर’ ला १७०० कोटींचे उत्पन्न दरवर्षाला मिळते. रेल्वेची हि जागा ‘कॉनकोर’ भाडेतत्वावर वापरते, यासाठी अगोदर प्रत्येक कंटेनरवर भाडे आकारले जायचे, यानुसार एकूण २५ लाख रुपये वर्षापोटी भाडे द्यावे लागत असे, मात्र यात रेल्वेने बदल करुन, आता जागेच्या आकारमानानुसार भाडे आकारण्याचा निर्णय घेतला असून, दर महिन्याला ३ कोटींची मागणी केली आहे. मात्र, यार्डाचे उत्पन्न लक्षात घेता, ऐवढी मोठी रक्कम देणे शक्य नाही. त्यामुळे ‘कॉनकोर’ ने २९ एप्रिलपासून यार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अगोदरच लॉक डाऊनमुळे देशातील उद्योगधंदे रसातळाला गेले आहेत. त्यात कंटेनर यार्ड बंद केल्यास उद्योजकांना मोठे नुकसान सहन करावे लागणा आहे. 

२७ देशांमध्ये वाहतुक 
जिल्ह्यातून पीव्हीसी पाईप, सिंचन साहित्य, पॉलिमर्स आदी औद्योगिक उत्पादनांसह केळी, दाळ, मका, कांदे, फळांचे पल्क आदी शेतमालाची अमेरिका, जपानसह २७ देशांमध्ये समुद्री मार्गे वाहतुक केली जाते. यासाठी मुंबईपर्यंत रेल्वेतून माल पोहचविला जातो. तेथून सम्रुदी मार्गे इतर देशात मालाची रवानगी केली जाते. निर्यातीमुळे देशाला परकीय चलन प्राप्त होते. मात्र आता ‘कॉनकोर’ ने यार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला असून, विदेशात निर्यातीला अडचणी निर्माण होऊन याचा परिणाम परकीय चलनात घट होईल. 

कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड 
भुसावळ कंटेनर यार्डात दीडशे कामगार असून, यातून त्यांची उपजिवीका चालते. यात कंटेनर मध्ये माल चढविणे-उतरविणे, कंटेनर रिपेरिंग, ट्रक चालक, हेल्पर आदींचा समावेश आहे. मात्र यार्ड बंद होणार असल्याने या सर्वांचा रोजगार हिरावला जाऊन त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोळसणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhusawal railway contener yard closed