कोरोना इफेक्‍ट: कॉस्मेटिक' उत्पादकांना कोट्यवधींचा फटका ! 

 Corona effect cosmetic manufacturers
Corona effect cosmetic manufacturers


जळगावः "कोरोना' विषाणूच्या संसर्गामुळे कॉस्मेटीक उत्पादन क्षेत्रालाही मोठा फटका बसला असून, "सलून'शी निगडित देशभरातील साहित्य उत्पादक कंपन्या व त्यांच्या डीलर्सची मोठी अङचण झाली आहे. "लॉकडाऊन'मुळे या साधनांचा वापरही शून्यावर आला असून, संबंधित कंपन्यांमधील कामगारांचे भवितव्यही अनिश्‍चित असल्याचे सांगितले जात आहे. 

भारत हा सौंदर्य प्रसाधने क्षेत्रात जगात आघाडीवर आहे. यासंबंधीच्या उत्पादन आणि सेवा क्षेत्रात दुसऱ्या स्थानी असून, "एफआईसीसीआई' आणि "केपीएमजी'च्या अहवालातील "रॅकिंग'मध्ये भारत सौंदर्य प्रसाधने उद्योग क्षेत्रात जगात पहिल्या पाचमध्ये आहे. 

देशभरातील दिल्लीसह अहमदाबाद, नडियाद (गुजरात), मुंबई, पुणे (महाराष्ट्र), इंदूर (मध्य प्रदेश), हैदराबाद आदी ठिकाणी सलून साहित्य उत्पादक कंपन्या आहेत. त्यात ब्लेड, हेअर क्रीम, शेव्हिंग क्रीम, विविध प्रकारच्या व रंगांच्या मेंदी, हेअर डाय, मसाज क्रीम, मालिश तेल, फेशिअल, वस्तारे, कैच्ची, ब्रश, कंगवे, कास्मो प्लस क्रीम, डेनिम क्रीम, डेटॉल, ओल्ड स्पाइस, आफ्टर शेव्हिंग लोशन, तुरटी, स्प्रे पंप, ब्लिचिंग, शहनाज गोल्ड, कटिंग मशिन, हेअर ड्रायर, विविध प्रकारचे हेअर कलर, सलून चेअर, विविध कॉस्मेटिक सौंदर्य प्रसाधनांसह "सलून'ला लागणाऱ्या यंत्रसामग्री बनविल्या जातात. देशभरातील विविध कंपन्यांची रोजची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. 

सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र "लॉकडाउन' करण्यात आले आहे. दिल्लीसह अहमदाबाद, नडियाद, मुंबई, पुणे, इंदूर, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई यांसह देशातील "मेगा सिटीं'मधील "मेन्स' आणि "लेडीज पार्लर' मॉल गेल्या वीस दिवसांपासून "लॉकडाउन' झाले आहेत. कंपन्यांचे शहरासह तालुकास्तरावरही छोटे- मोठे डीलर्स आहेत. त्यांचीही महिन्याला चार ते सात लाखांची उलाढाल होत असते. परिणामी विविध सौंदर्य प्रसाधन उत्पादक कंपन्यांची रोजची कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे ब्लेड उत्पादक डॉलर, हिंदुस्थान लिव्हर, टोपॉज, आरके ग्रुप, शिरॉन, जिलेट यांसह विविध कंपन्यांसह डीलर्सचे हजारो कर्मचारीही घरात बसून आहेत. 

कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशातच "लॉकडाउन' करण्यात आले आहे. शासनाकडून सलून साहित्य उत्पादक कंपन्यांना नोटिसांद्वारे 20 मार्चपासून बंद पाळण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे सलून साहित्य उत्पादन पूर्णतः बंद झाले आहे. आमच्या कंपनीत सुमारे पाच हजार कर्मचारी असून, ते सर्व घरी बसून आहेत. उत्पादन बंद असल्यामुळे कंपनीला कोट्यवधींचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. कंपनीतर्फेही "कोरोना'संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. 
- हरीश पाटील, रिझनल सेल्स मॅनेजर, टोपॉज, मुंबई 

राज्यातील नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार यांसह दहा जिल्ह्यांची जबाबदारी आहे. भारत हा सर्वाधिक तरुणांचा देश असून, 49 टक्के तरुण आहेत. तरुण व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी सजग असतात. देशात विविध प्रकारच्या सौंदर्य प्रसाधन उत्पादक कंपन्या आहेत. त्याही आता "लॉकडाउन' आहेत. त्यामुळे उत्पादन निर्मितीही बंद आहे. कर्मचारीही घरात बसून आहेत. "कोरोना'विरुद्धची लढाई ही सर्वांनी सहभागी होऊन जिंकूच. 
- सुधीर देशपांडे, एरिया सेल्स मॅनेजर, टोपॉज, नगर 

"सलून'सह सौंदर्य प्रसाधन उत्पादक कंपन्यांचे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात दोन ते तीन डीलर्स आहेत. प्रत्येक डीलर्सची रोजची उलाढाल दोन ते पाच लाखांची होते. सध्या "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर देशभरात "लॉकडाउन' करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच कंपन्या बंद आहेत. परिणामी रोजची होणारी कोट्यावधींची उलाढालही ठप्प झाली आहे. 
- रमाकांत अहिरे, प्रगती एजन्सी, मालेगाव (जि. नाशिक) 


ज्या व्यक्‍तीच्या हातात कला आहे, ती व्यक्‍ती उपाशी राहत नाही, असे म्हटले जाते. पण, कोरोना विषाणूने सर्वांनाच हताश केले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात "लॉकडाउन' आहे. परिणामी, सलून व्यवसाय ठप्प झाल्याने कारागिरांवर उपासमारी वेळ आली आहे. तसेच आमच्या व्यवसायावरही परिणाम होऊन रोजची हजारोंची उलाढाल ठप्प झाली आहे. "लॉकडाउन'च्या काळातील वीस दिवसांत सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, "लॉकडाउन'ही गरजेचे आहे. "कोरोना'विरुद्धची लढाई जिंकूच! 
- महेश मराठे, संचालक, ओमसाई ब्यूटी, जळगाव 

सलून व्यवसायात सोशल डिस्टन्सिंग पाळू शकत नाही. सलून व्यावसायिकांना आजाराचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण होऊ शकते. लॉकडाउनमुळे सलून व्यवसाय ठप्प पडला आहे. सलून दुकाने अन्‌ ब्यूटी पार्लरही बंद असल्यामुळे त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावरही झाला असून, रोजची सुमारे 30 हजारांपर्यंतची उलाढाल ठप्प झाली आहे. सलून व्यावसायिकांमध्ये आमच्याकडून जनजागृतीही केली जात आहे. "कोरोना'विरुद्धच्या लढाईत आम्ही सर्व व्यापारीही सहभागी आहोत. 
- सोपान सुर्वे- देशमुख, संचालक, श्रीराम कॉस्मेटिक, जळगाव
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com