esakal | कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणा; पालकांची आर्त हाक
sakal

बोलून बातमी शोधा

कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणा; पालकांची आर्त हाक

धरणगावसह जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी कोटा येथे आहेत. या विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमुळे घरी येता येत नाही. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालक वर्ग चिंताग्रस्त आहे. 

कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणा; पालकांची आर्त हाक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धरणगाव : धरणगावसह जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी कोटा (राजस्थान) येथे गेलेले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे तेथे ते अडकले असून, अनेकांचे हाल होत आहेत. या विद्यार्थ्यांना घरी आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. 

पालक चिंताग्रस्त 
अलीकडे आयआयटी क्षेत्रातील नामांकित महाविद्यालयात, संस्थेत प्रवेश मिळावा म्हणून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक विद्यार्थी कोटा येथे जेईई, ऍडव्हान्स, सीईटी अशा परीक्षांच्या तयारीसाठी क्‍लासेस करीत असतात. राज्यातील साधारण दोन हजार विद्यार्थी कोटा येथे अडकले असल्याची माहिती पालकांकडून समजते. या क्‍लासेसमध्ये धरणगावसह जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी कोटा येथे आहेत. या विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमुळे घरी येता येत नाही. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालक वर्ग चिंताग्रस्त आहे. 

पालकमंत्र्यांना साकडे 
आपल्या पाल्यांना घरी आणावे यासाठी ते धडपड करीत आहेत. मात्र, लॉकडाऊन असल्याने कोणतीही सुविधा नाही. यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील कोटा येथे असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणणेसाठी व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. राजस्थान सरकारने या विद्यार्थ्यांना घेऊन जानेसाठी परवानगी दिलेली आहे. मात्र, पालक रेल्वे, बस आदी सुविधा बंद असल्याने जाऊन मुलांना आणू शकत नाहीत. यासाठी शासनाने पाऊले उचलावीत यासाठी जिल्ह्यातील पालकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना साकडे घातले आहे. 

""आमच्या मुलांची परत आणण्याची व्यवस्था करा अथवा आम्हाला कोटा येथे जाऊन मुलांना घेऊन येण्याची परवानगी द्या. शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रवास केला जाईल. लॉकडाऊनमुळे मुलाच्या आठवणीने कुटुंब अस्वस्थ झाले आहे. यासाठी आम्ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना साकडे घातले आहे.'' 
- उमाकांत बोरसे, पालक- धरणगाव.