"सीबीएसई'चा भर आता "आर्ट इंटिग्रेटेड' प्रणालीवर 

cbse-
cbse-

जळगाव : इंग्रजी माध्यमासह राष्ट्रीय प्रवेश परीक्षांसाठीचा पूरक अभ्यासक्रम, दहावी-बारावीचे वाढते निकाल आदी कारणांमुळे पालकांचा ओढा "सीबीएसई' शाळांकडे वाढत असून, या शाळांची राज्यातील संख्या एक हजारावर पोहोचली आहे. राज्यातील एक हजार तीन शाळा सीबीएसईशी संलग्न असून, त्यात जिल्ह्यातील 39 शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे "सीबीएसई'ने आता कलाशिक्षणावर भर देण्याचे ठरविले असून, त्याची येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार आहे. 

नक्‍की पहा - मुलींच्या नावाची लागणार घरावर पाटी 
सीबीएसईशी संलग्न शाळांमध्ये खासगी शाळांचेच प्रमाण जास्त आहे. खासगी शाळा राज्य मंडळाच्या शाळांपेक्षा जास्त शुल्क घेत असूनही पालक सीबीएसईच्या शाळांना पसंती देतात. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये सीबीएसईशी संलग्न शाळा आहेत. त्यात खासगी संस्थांच्या शाळांसह केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय या शासकीय शाळांचाही समावेश आहे. गेल्या वर्षीपर्यंत राज्यातील शाळा सीबीएसईच्या चेन्नई विभागाच्या अखत्यारीत येत होत्या. मात्र, यंदाच सीबीएसईने चेन्नई विभागाचे विभाजन करून स्वतंत्र पुणे विभागाची निर्मिती केली. 


संगीत, नृत्य, नाटकासह पाककलाही 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कला शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. कला शिक्षणामध्ये संगीत, नृत्य, नाटक या पारंपरिक कलांसह पाककलेचाही समावेश करण्यात आला असून या निर्णयामागे विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी करण्याचा सीबीएसईचा विचार आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे घटक असलेल्या शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि कला क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी सीबीएसईने चर्चा केली. कलांच्या समावेशामुळे पारंपरिक शिक्षण आंतरविद्याशाखीय होणार आहे. 


काय असेल अभ्यासक्रमात 
कला शिक्षणात सीबीएसईने संगीत, नृत्य, दृश्‍यकला आणि नाटक यांना प्राधान्य दिले आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाककलेचीही ओळख करून द्यावी, असे सीबीएसईने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना पाककलेची ओळख करून दिल्याने त्यांना पौष्टिक खाद्य, भारतातील पिके, वेगवेगळ्या प्रकारची धान्य, भाज्या, तेल कसे तयार होते, शेतीची योग्य पद्धत या विषयीही माहिती मिळेल. तसेच विविध राज्यांतील वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचीही ओळख होईल, असे सीबीएसईचे म्हणणे आहे. कला शिक्षणाचा भाग म्हणून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाककलेसाठी काही वर्ग घेण्यात यावेत. त्यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे प्रमाण सारखेच असावे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवण्यासही हरकत नाही. मात्र, शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना त्यातून आनंद मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे वर्ग समावेशक, संवादी आणि प्रयोगशील असावेत, असेही निर्देश सीबीएसईने दिले आहेत. 

आठवड्याला दोन तास कलाशिक्षण 
अभ्यासक्रमात कला शिक्षण बंधनकारक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासूनच करण्यात येईल. त्यामुळे शाळांनी दर आठवड्याला किमान दोन तास कला शिक्षणासाठी देणे आवश्‍यक असल्याचे सीबीएसईने नमूद केले आहे. कला शिक्षणाची परीक्षा होणार नाही, तर वर्षभरातील एकूण प्रक्रियेवर आधारित विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल. त्यात विद्यार्थ्यांकडून काही प्रयोग, प्रकल्प करून घेतले जातील, तर कलांची मूलभूत ओळख करून दिली जाईल. 

कृतियुक्त शिक्षण व प्रत्येक विषयातील मूळ संकल्पना स्पष्ट होण्यासाठी सीबीएसईच्या नवीन "आर्ट इंटिग्रेटेड' या प्रणालीची मदत होणार आहे. यासोबत विद्यार्थ्याला दैनंदिन जीवनात शालेय अभ्यासक्रमाची उपयुक्तता सिद्ध करता येणार आहे. दैनंदिन जीवन आणि शालेय अभ्यासक्रम यांची सांगड सीबीएसईच्या माध्यमातून या नव्या प्रणालीद्वारे घालून देण्यात आली आहे. 
- संजय वाघुळदे' प्राचार्य, श्री स्वामिनारायण इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा (ता. रावेर) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com