वाढत्या तापमानाबरोबर चाराही कडाडला 

वाढत्या तापमानाबरोबर चाराही कडाडला 

जळगाव ः राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उन्हाळा अतिशय कडक आहे. नद्या, नाले कोरडेठाक पडले आहेत. धरणांतील पाणीसाठाही कमी-कमी होत चालल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी आणताना पशुपालकांची ससेहोलपट होत असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे वाढत्या तापमानाबरोबर जनावरांच्या चाऱ्याचेही भाव वाढतच आहेत. काही महिन्यांपूर्वी 1900 ते 2000 रुपये प्रतिशेकडा उपलब्ध होणारा चारा सध्या 2500 ते 2600 रुपयांप्रमाणे मिळत आहे. 
जनावरांसाठी बाजरीच्या भुशीची उचल सुरू आहे. दुधाळ पशुधनासह बैलजोड्यांसाठी बाजरीचा चारा उपयुक्त मानला जातो. जळगाव, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, यावल भागात बाजरीची पेरणी बऱ्यापैकी झाली होती. सध्या मळणी सुरू आहे. चाऱ्याच्या पेंढ्या बांधून त्या शेतात गोळ्या केल्या आहेत. त्यांची विक्री सुरू असून, थेट शेतातून त्यांची खरेदी खरेदीदार करीत आहेत. गत हंगामात बाजरीचा चारा किंवा कडबा प्रतिशेकडा 1800 ते 2100 रुपये भावाने खरेदीदारांनी थेट शेतातून घेतला होता. या हंगामात सर्वत्र चाराटंचाई आहे. 
मक्‍याची लागवडही घटली. कोरडवाहू ज्वारीचे क्षेत्र मोजकेच होते. परिणामी चाऱ्याचे भाव वधारले आहेत. मक्‍यावर लष्करी अळी असल्याने नुकसानीच्या भीतीने बाजरीची पेरणी अनेक शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे खानदेशात बाजरीचे क्षेत्र या हंगामात सुमारे सात हजार हेक्‍टरने वाढले. सध्या बाजरीच्या चाऱ्याची वाहतूक जिल्ह्यात सुरू आहे. बाजरीचा चारा, दादर (ज्वारी) व मका पिकाच्या चाऱ्याच्या तुलनेत उंची व घेराने कमी असतो. यामुळे या चाऱ्याचे भाव ज्वारीच्या चाऱ्याच्या तुलनेत कमी आहेत. 

5 हजार हेक्‍टरवर चारा लागवड 
चाराटंचाई भासू नये, यासाठी पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व वन विभागामार्फत जिल्ह्यातील पाच हजार हेक्‍टरवर चारा लागवड केली आहे. हा चारा शेतकऱ्यांना शासनामार्फत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील 12 हजार 413 शेतकऱ्यांना 25 हजार 800 किलो चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. कृषी विभागानेही 27 हजार शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप केले आहे. 

जिल्ह्याला जुलै 2019 पर्यंत 14 लाख 33 हजार टन चारा लागणार असून, सध्या जिल्ह्यात खरीप, रब्बी हंगाम व गाळपेऱ्यावर करण्यात आलेल्या चारा लागवडीतून 13 लाख 78 हजार 889 टन चारा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात चारा छावण्यांची आवश्‍यकता भासणार नाही. 
- डॉ. संजय गायकवाड, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, जळगाव 

जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. भविष्यात उत्पन्न होणाऱ्या चाराटंचाईची परिस्थिती लक्षात घेता सदर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील चारा शेजारच्या जिल्हा अथवा राज्यात वाहतूक करण्यास यापूर्वीच निर्बंध घालण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध, संस्थेविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. 
- जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com