त्याने कागदावर काढले अपघाताचे चित्र आणि पुढे जे काही घडले थरकाप उडविणारे... 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

एरंडोल येथून जवळच असलेल्या पिंपळकोठा येथे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता. 23) खासगी प्रवासी वाहतूक करणारी कालीपिली व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये दहा वर्षीय प्रसन्न निवृत्ती वंजारी आणि त्याच्या आई- वडिलांचा देखील समावेश होता.

एरंडोल : पांढऱ्या जाड कागदी सिटवर शाळा अन्‌ समोरून गेलेला महामार्ग...या महामार्गावर डोळ्यादेखत कार आणि बसचा भीषण अपघात झाला...यावर आधारित "मी पाहिलेला अपघात' हे संकल्प चित्र रेखाटले. त्यात रंग भरून आनंदाने आई- वडील आणि शेजाऱ्यांना दाखविले. पण कागदावर रेखाटलेले चित्र प्रत्यक्षात स्वतःवर बेतेल असे मनातही नसणाऱ्या प्रसन्न या दहा वर्षीय बालकाचा एरंडोलजवळील भीषण अपघातात मृत्यू झाला. 

एरंडोल येथून जवळच असलेल्या पिंपळकोठा येथे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता. 23) खासगी प्रवासी वाहतूक करणारी कालीपिली व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये दहा वर्षीय प्रसन्न निवृत्ती वंजारी आणि त्याच्या आई- वडिलांचा देखील समावेश होता. दुर्घटना होण्याच्या पाच दिवस अगोदर प्रसन्नने घरी अपघाताचे छायाचित्र काढून त्यात रंग भरले होते; अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. या भीषण अपघातात प्रसन्न वंजारीसह त्याचे आई, वडील व अन्य सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 

हेही पहा > दोन्ही मुलांना अभियंता केल्यावर पुतण्याला न्याशाधीश...रिक्षाचालक काकाचा संघर्ष 

अवघ्या पाच किमी अंतरावर घर पण.. 
दहा वर्ष वय असलेल्या प्रसन्न हा गांधीपुरा परिसरात सर्वांचा लाडका. प्रसन्न निवृत्ती वंजारी आई- वडिलांसह जळगाव येथे नातेवाइकांच्या उत्तरकार्यासाठी गेला होता. उत्तरकार्य आटोपून कालीपिलीने घराकडे येत असलेल्या वाहनास घरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर अपघात होऊन त्यात त्याचा व आई- वडिलांसह मृत्यू झाला. गणेशोत्सव, दुर्गोत्सव यासह सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात त्याचा सक्रिय सहभाग असायचा. रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिकत असलेला प्रसन्न अभ्यासात देखील अत्यंत हुशार होता. त्यास चित्रकलेची देखील आवड होती. 

नक्‍की वाचा > प्रभू श्रीरामांनी याठिकाणी मारला बाण अन्‌ निघाले गरम पाणी...आजही ते गोमुखातून निघते 

"मी पाहिलेला तो अपघात' 
अपघात होण्याच्या पाच दिवस अगोदर प्रसन्न याने "मी पाहिलेला अपघात' या विषयावर संकल्प चित्र काढून त्यात विविध रंग देखील भरले होते. त्याने काढलेल्या छायाचित्रात राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांमध्ये झालेला भीषण अपघात व त्यात वाहनांचे झालेले नुकसान व मरण पावलेले प्रवासी असे चित्र रेखाटले होते. या छायाचित्रात त्याने राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस असलेली हिरवळ, झाडे तसेच काही अंतरावर असलेले हॉटेल असे उभेऊभ चित्र रेखाटले होते. त्याने काढलेल्या छायाचित्राचे विद्यार्थी मित्र तसेच परिवारातील सदस्यांनी देखील कौतुक केले होते. 

अन्‌ पाचव्याच दिवशी... 
छायाचित्र काढल्यानंतर केवळ पाचव्या दिवशीच त्याचा राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यू व्हावा हे कल्पना करण्यापलीकडचे असल्याचे त्याच्या परिवारातील सदस्यांनी भावनाविवश होऊन सांगितले. प्रसन्नला जणू मृत्यूची जाणीव अगोदरच लागली होती, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. केवळ दहा वर्ष वयाचा व सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभागी होणारा प्रसन्न आपल्यातून अचानक निघून जाईल असा विश्वास ठेवायला त्याचा मित्र परिवार आजही तयार नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon child accident peanting after five days