भुर्रकन उडून' गेलेली चिऊ झाली दिसेनासी...!  

भूषण श्रीखंडे
शुक्रवार, 20 मार्च 2020

चिमण्यांची संख्या कमी झाली नसून त्या मानवापासून दूर गेल्या आहेत. त्यांना मानवी अधिवासात राहण्यास आवडते परंतु, आता त्यांना घरटे बांधण्यासाठी जागा, अन्न, पाणी मिळत नसल्याने चिमण्यांचा अधिवास दूर गेला आहे. त्यांना पुन्हा आपल्याजवळ आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. 
 शिल्पा गाडगीळ, पक्षीमित्र. 

 

जळगाव : कधी काळी पहाटे चिमण्यांच्या कानावर ऐकू येणारा मधूर चिवचिवाट आता दुर्मिळ झालांय.. घरासमोरील झाडांवर, अंगणात, गच्चीवर दिसणारी एखाद-दुसरी चिमणीही आता दिसेनाशी झालीय.. "येगं येगं चिऊ..' असं म्हणत बाळाला घास भरविणारी आई- आजी तर आहे, पण चिऊ पुन्हा येईल म्हणून "अन्‌ भुर्रकन उडून जा..' असं म्हटल्यानंतर ती उडालेली चिऊ काही आज यायला तयार नाही.. कारण, चिमणीचा अधिवासच धोक्‍यात आलाय.. मानवी वस्त्यांचं प्राणी, पक्ष्यांच्या अधिवासातील अतिक्रमण, त्यासाठी केलेली मोठी वृक्षतोड हे त्याचे प्रमुख कारण.. 

भारतात सर्वांत जास्त संख्येने असणारा पक्षी म्हणून कधी काळी चिमणी ओळखला जायचा. मात्र मागील काही वर्षापासून शहरी भाग सोडा ग्रामीण भागात देखील चिमणी हा पक्षी दिसेनासा झाला आहे. चिमणीची संख्या कमी झाले असे म्हणत असले तरी चिमण्याची संख्या कमी झाल्या नसून त्यांचे अधिवास हा मानवी वस्तीपासून दूर गेला आहे. जळगाव शहरात देखील मध्यवर्ती ठिकाणी कमी दिसत असल्या तरी शहरातील वाढीव वस्त्यांचा परिसर व सभोवतालच्या शेत परिसरात चिमण्या दिसून येतात. त्याठिकाणी दरवर्षी आजच्या दिवशी त्यांची गणनाही होत असते. 

गेल्यावर्षी 1200 चिमण्या 
जळगाव शहरात गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्षीप्रेमींकडून शहरात तसेच शहराच्या आजूबाजूच्या परिसरात चिमण्यांची गणना केली जाते. त्यानुसार मागील वर्षी 1 हजार 200 चिमण्यांची गणना करण्यात आली. जळगाव शहराच्या सभोवतालच्या वस्त्यांसह काही शिवारामध्ये ही गणना करण्यात आली. 

जळगावात दोन चिमण्यांचे अस्तित्व 
जळगाव शहर व परिसरात दोन प्रकारच्या चिमण्या आढळून आल्या आहेत. यात प्रामुख्याने हाउस स्पॅरो (साधी चिमणी) ही जवळपासच्या परिसरात दिसते. तसेच पितकंठी चिमणी (जंगली चिमणी). मानवी वस्तीपासून दूर, झाडा-झुडपात या चिमणीचा अधिवास पक्षीप्रेमींना आढळून आला आहे. 

मोबाईल टॉवरचा परिणाम नाही 
मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे चिमण्यांचे संख्या घटली असा सर्वत्र समज आहे. परंतु, पक्षीप्रेमींनी केलेल्या अभ्यासात मोबाईल टॉवरवर तसेच त्या परिसरातही चिमण्यांसह इतर पक्ष्यांचे थवेच्या थवे आढळून येत आहेत. त्यामुळे मोबाईल टॉवरमुळे चिमण्यांचे संख्या घटते हे सिद्ध झाले नाही. मात्र वाढलेले मानवी वस्ती, सिमेंटची जंगलं, त्यात त्यांना राहण्यायोग्य जागा मिळत नसल्याने चिमण्या दूर जात आहेत. 

चिमणीचे आयुष्य चार वर्षांचे 
चिमणीचे आयुष्य हे नैसर्गिक अधिवासात 6 महिन्यांपासून साधारण 4 वर्षांपर्यंत असते. त्यात चिमण्यांना सुरक्षित वातावरण तसेच त्या आजारापासून दूर राहिल्यास त्यांचा अधिवास सुमारे 20 वर्षांपर्यंतचा असतो, असे पक्षी अभ्यासकांच्या निरीक्षणातून समोर आले आहे. 

चिमणीला.. अन्‌ निसर्गालाही 
 चिमण्यांचे घरटे घरातील अडगळीचे ठिकाण असते, ते काढू नये. 
 नवीन घरांची रचना थोडी बदल केल्याने घरट्यांसाठी मिळते जागा. 
 घराच्या अवतीभवती मोठ्या झाडासोबत लहान झाडे- झुडपे लावणे. 
 चिमण्यांना जमिनीवर उतरण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करणे. 
 घराच्या परिसरात कृत्रिम घरटे, दाणे, पाण्याची व्यवस्था करणे 
 घराच्या खिडक्‍यांना लावलेल्या काचांवर पडदे लावणे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Chimney Day Special Chimneys rare due to occupation risk