शहर बससेवेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

जळगाव : शहरात कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ ते जुने बसस्थानक अशी बससेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर आता शहरातील इतर भागातही बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली असून, यासाठी आंदोलनात उतरण्याची तयारी त्यांनी केली आहे. 

जळगाव : शहरात कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ ते जुने बसस्थानक अशी बससेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर आता शहरातील इतर भागातही बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली असून, यासाठी आंदोलनात उतरण्याची तयारी त्यांनी केली आहे. 
शहरात शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिका संपूर्णपणे असमर्थ ठरली आहे. भारतीय जनता पक्षाची महापालिकेत एकहाती सत्ता असतानाही त्यांनी ही सेवा सुरू केलेली नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नेते मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. तर विरोधी पक्ष असलेला शिवसेनाही नागरिकांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करीत असलेले दिसत आहे. 

...अन्यथा तीव्र आंदोलन 
शहरात बससेवा सुरू करण्यास महापालिका असमर्थ ठरली असल्याने एसटी महामंडळाच्या प्रशासनाने ती सुरू करावी, अशी मागणी कॉंग्रेसने महामंडळाकडे केली आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की "एसटी'तर्फे विद्यापीठ ते जुने बसस्थानक अशी बससेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर आता महामंडळाने जुने बसस्थानक ते पिंप्राळा हुडको, हरिविठ्ठलनगर अशी बससेवा सुरू करावी. कारण या भागातील नागरिकांना पैसे खर्च करून रिक्षाने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या भागात लवकरात लवकर सेवा सुरू करण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. याबाबत त्यांनी महामंडळ अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. जिल्हा सरचिटणीस विष्णू घोडेस्वार यांची या निवेदनावर स्वाक्षरी आहे. 

परिवहन समितीच नाही 
महापालिकेत भाजपची सत्ता येऊन तब्बल एक वर्षे होत आहे. मात्र, या काळात शहर बससेवा तर सुरूच केली नाही. मात्र अद्यापपर्यंत परिवहन समितीही स्थापन करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेतील वाहनांचे नियोजन कोणाकडे आहे, हाच प्रश्‍न निर्माण होत आहे. ज्या महापालिकेत परिवहन समिती नाही, त्या महापालिकेच्या कारभाराचे वर्तुळ पूर्ण कसे होतेय? हाच प्रश्‍न आहे. त्यामुळे महापालिकेत ही समिती स्थापन होऊन शहर बससेवा कधी सुरू होणार, हाच प्रश्‍न आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city bus survice