दिव्यांच्या प्रकाशात उजडली जळगावनगरी!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

जळगावकरांनी एकजूट दाखविली. रात्री नऊनंतर शहरातील प्रत्येक घराच्या गच्चीवर दिवे आणि मोबाईलच्या टॉर्चचा झगमगाट पाहण्यास मिळाला

जळगाव : कोरोना व्हायरसने ग्रासलेल्या देशाला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ मिनिट दिवे लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येकाने दिवा लावला. नऊ मिनिट घरातील सर्व लाईट बंद करून जो- तो घराच्या गच्चीवर जावून दिवे प्रज्वलीत केले. यामुळे संपुर्ण जळगावनगरी दिव्यांच्या प्रकाशात उजडून निघाली होती. 
संपुर्ण जगात कोरोना व्हायरस पसरला असून, देशात देखील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत जात आहे. हा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाउन घेण्यात आला असून, यातील आणखी एक उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.5) रात्री नऊ वाजता नऊ मिनिट दिवे लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जळगावकरांनी एकजूट दाखविली. रात्री नऊनंतर शहरातील प्रत्येक घराच्या गच्चीवर दिवे आणि मोबाईलच्या टॉर्चचा झगमगाट पाहण्यास मिळाला. 

दिव्यांचा दिपोत्सव 
दिपोत्सवाच्या काळात आकाशकंदील लावण्यासोबत दिवे लावून अवघे आसमंत प्रकाशमय केले जात असते. मात्र आज दिवाळीचा उत्सव नसला तरी घराच्या समोर आणि गच्चीवर दिव्यांच्या प्रकाशाचा झगमगाट पाहण्यास मिळाला. यामुळे आज दिव्यांचा दिपोत्सव साजरा झाल्याचा अनुभव आला. 

भारत माता की जय...चा घोष 
कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी सारेजण एक असल्याचा अनुभव आज पाहण्यास मिळाला. दिवे लावण्यासोबत अनेकांनी भारत माता की जय...चा जयघोष केला होता. यामुळे एक वेगळे वातावरण अनुभवण्यास मिळाले. 

फटाके फोडण्याचा मुर्खपणा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे कोरोनाशी लढा देण्यासाठी नऊ मिनिट दिवे लावण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देखील मिळाला. परंतु काही जणांनी दिवाळी उत्सवाप्रमाणे फटाक्‍यांची आतिषबाजी करण्याचा मुर्खपणा केला. देश एका वेगळ्या संकटातून जात असताना देखील त्याचे भान न ठेवता फटाके फोडून जणू काही आनंद साजरा करत असल्याचा देखील एक वेगळा अनुभव पाहण्यास मिळाला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city corona go light off and deep on pm modi