"लॉकडाउन'मध्येही क्‍लासेसची ऑनलाइन द्वारे खुली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

"ऑनलाइन' मार्गदर्शन जवळपास सर्वच क्‍लासचालकांनी सुरू केले असून, विद्यार्थीही घरबसल्या यातून अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. 

 जळगाव ः "करिअर' घडविण्याच्या उंबरठ्यावरील वर्ष म्हणजे इयत्ता बारावी. या महत्त्वाच्या वर्षात चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने उन्हाळी सुटीत क्‍लास (खासगी वर्ग) प्रवेश घेतले जातात. त्या अनुषंगाने प्रवेश घेतला असला, तरी "लॉकडाउन'ची सद्यःस्थिती लक्षात घेता मुलांना क्‍लासला जाणे शक्‍य नाही आणि क्‍लास चालविणेही शक्‍य नाही. त्यामुळे संबंधित क्‍लासचालकांनी विद्यार्थ्यांसाठी "ऑनलाइन' मार्गदर्शनाचे द्वार खुले केले आहे. मोबाईल ऍप, यू-ट्यूब चॅनल, व्हीडीओ तसेच व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून "टेस्ट पेपर' सोडविण्यासाठी दिले जात आहेत. हे "ऑनलाइन' मार्गदर्शन जवळपास सर्वच क्‍लासचालकांनी सुरू केले असून, विद्यार्थीही घरबसल्या यातून अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. 

"ऑनलाइन लेक्‍चर' सुरू 
नंदलाल गादिया (संचालक, महावीर क्‍लासेस, जळगाव) ः आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस अद्याप सुरू झालेल्या नव्हत्या. केवळ बारावीतील विद्यार्थ्यांच्या बॅचचा प्रवेश झाला असताना "लॉकडाउन' सुरू झाले. त्यामुळे क्‍लास घेण्याचे लांबणीवर पडले. मात्र, बारावीची बॅच सुरू करण्याच्या अनुषंगाने "टेक्‍नॉलॉजी'चा वापर करून "ऑनलाइन क्‍लास'ला सुरवात केली. मोबाईलमधील "झूम ऍप'च्या माध्यमातून सुरवातीला टेस्टिंग घेऊन आजपासून प्रत्यक्षात व्हीडीओ कॉलिंगद्वारे मुलांशी "इंटरॅक्‍शन' करणे सुरू केले. एकाच वेळी तीस मुलांना जोडून ही सुरवात केली, ती "लॉकडाउन' संपेपर्यंत राहील. 

"ऑनलाइन टिचिंग' 
जयदीप पाटील (संचालक, नोबेल फाउंडेशन, जळगाव) ः सध्या देशभरात "लॉकडाउन'ची परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्‍लासमध्ये टिचिंग करणे बंद आहे. पण बारावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने त्यांचा वेळ वाया जायला नको. त्यामुळे "टेक्‍नॉलॉजी'चा वापर करून रोज सायंकाळी दीड-दोन तास "झूम ऍप'द्वारे "व्हीडीओ कॉन्फरन्स कॉलिंग' केले जात आहे. त्यातून मुलांना मार्गदर्शनासाठी "ऑनलाइन लेक्‍चर' घेत आहोत. "झूम ऍप'द्वारे एकाच वेळी चाळीस विद्यार्थ्यांना शिकविणे सुरू असून, मोबाईल व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून टेस्ट आणि नोटस्‌ देणे सुरू आहे. यामुळे मुलांच्या अभ्यासात कुठलाही खंड न पडता ते अभ्यासात मग्न राहतात. 

"ऍप' अन्‌ "यू-ट्यूब चॅनल'चा वापर 
आशीष पसुगडे (ऍकॅडमिक डायरेक्‍टर, करिअर पॉइंट, जळगाव) ः क्‍लासमध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन करणे बंद असले, तरी "ई-करिअर पॉइंट' या स्वतःचे "ऍप्लिकेशन' आणि "करिअर पॉइंट कोटा' या यू-ट्यूब चॅनलद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. यातून "लाइव्ह लेक्‍चर' सुरू आहे. सकाळी अकरा- बारानंतर "अपलोड' करून विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार ते पाहू शकतात. तसेच "रिव्हिजन टेस्ट पेपर' घेणे सुरू असून, "नीट'च्या विद्यार्थ्यांचा व्हॉटस्‌ऍप ग्रुप बनवून त्यातून "टेस्ट पेपर' पाठविले जात आहेत. तीन तासांत पेपर सोडविण्याचे सांगितले आहे. याबाबत पालकांनाही सूचना देऊन ते सोडवून घेतले जातात. करिअर पॉइंटचे टेलिफोनर्स "कोरोना'ची जनजागृतीही करत आहेत. 

"क्‍लास प्लस ऍप'चा वापर 
शशिकांत टाकळकर (दामोदर केमिस्ट्री, जळगाव) ः जेईई, नीट, एमएच-सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "क्‍लास प्लस ऍप'च्या माध्ममातून "टेस्ट' देणे सुरू केले आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी "व्हीडीओ कॉन्फरन्सिंग'द्वारे लेक्‍चर सुरू करण्यात आले आहे. मुळात ज्या पद्धतीने शासनाकडून जेईई, नीट, एमएच-सीईटीच्या ऑनलाइन परीक्षा होतात त्याच पद्धतीने "टेस्ट पेपर' "अपलोड' करून मुलांकडून सोडवून घेतला जात आहे. शिवाय "ऍप'मध्ये "चॅट'चे ऑप्शन असल्याने "चॅटिंग'द्वारे मार्गदर्शन करणेही सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Classes also open online in "Lockdown"