संकटात तुमचा नगरसेवक संपर्कात आहे का? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

काही नगरसेवक अजूनही घराच्या बाहेर पडलेले नसल्याने आज महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर "संकटकाळी तुमचा नगरसेवक तुमच्या संपर्कात आहे का?' अशा आशयाचे थेट फलक अज्ञातांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ लावले.

जळगाव : जगात "कोरोना' या संसर्ग आजाराने थैमान घातले असून, शहरातही "लॉकडाउन'मध्ये संपूर्ण शहर थांबलेले आहे. त्यात मेहरुणचा एक रुग्ण "कोरोना'ग्रस्त आढळल्याने जळगावकरांची चिंता वाढलेली आहे. शहरातील 19 प्रभागांतील 75 नगरसेवक असून, काही प्रभागातील नगरसेवक आपल्या प्रभागात लक्ष ठेवून निर्जंतुकीकरण फवारणी, जनजागृती, गरजूंना मदत करण्याचे काम करत आहे. परंतु काही नगरसेवक अजूनही घराच्या बाहेर पडलेले नसल्याने आज महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर "संकटकाळी तुमचा नगरसेवक तुमच्या संपर्कात आहे का?' अशा आशयाचे थेट फलक अज्ञातांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ लावले. फलक पाहणारे जरी "लॉकडाउन'मुळे कमी असले तरी या फलकाची सर्वत्र चर्चा होती. दुपारी मात्र अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने हा फलक काढून तो जप्त केला. 
 
कचऱ्यामुळे डासांचा त्रास 
शहरातील अनेक नवीन वसाहतींसह रस्त्यांवर अजूनही कचरा साचल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी पडलेला कचरा आहे. त्यात राजमालतीनगर, हरिविठ्ठलनगर, श्‍यामनगर, रामानंदनगर, गिरणा पंपिंग रोड आदी ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात नगरसेवकांचे या समस्यांकडे दुर्लक्ष असल्याने ही समस्या सुटणार कधी अशी चिंता नागरिकांना लागली आहे. 
 
काही प्रभागांत प्रतीक्षाच 
शहरात महापालिकेकडून "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू आहे. तसेच त्या-त्या प्रभागातील सजग नगरसेवकांनी देखील आपल्या प्रभागात स्वःखर्चाने फवारणीचे औषध, पंप आणून आपल्या प्रभागत फवारणीचे काम करत आहे. परंतु अनेक प्रभागातील नगरसेवक अजूनही गांभीर्याने पुढे आलेले दिसून येत नाही. त्या प्रभागातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona corporation member contact baner city