कोरोना फायटर्स:  वृत्तपत्र वाटपाचे कार्य अविरत सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

राज्यात करोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरीही परिस्थितीशी सामना करीत वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी आपली सेवा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. 

जळगाव  : "कोरोना'चे संकट दूर करण्यासाठी शासन पातळीवरून अनेक प्रयत्न होत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वृत्तपत्राचे वितरणही काही दिवस बंद ठेवण्यात आले. परंतु लोकांपर्यंत देशभरातील घटनांची योग्य माहिती पोहोचविण्याचे कार्य फक्त वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच होत असल्याचे लक्षात घेत अनेक अडचणींवर मात करीत वृत्तपत्रे घरपोच सुरू ठेवण्याची मोहीम परत एकदा गतिमान झाली आहे. 
राज्यात करोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरीही परिस्थितीशी सामना करीत वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी आपली सेवा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. 

स्वच्छतेबाबत काळजी 
सकाळी चारला उठून वृत्तपत्रांचे पार्सल हाताळण्याच्या अगोदर हात सॅनिटायझरने धुवून नंतर हातात ग्लोज घालून तोंडावर मास्क लावला जातो. यासाठी वृत्तपत्र कार्यालयातर्फे या साहित्याचे वितरण वृत्तपत्र मंडळांना करण्यात आले होते. 

वाचकांमध्ये जनजागृती 
वृत्तपत्र हाताळल्याने संसर्ग पसरत असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविण्यात आली होती. त्यामुळे काही वाचक वृत्तपत्र घेण्यास धजावत नसल्याने त्यांच्यात जनजागृतीही वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे केली जात आहे. वृत्तपत्र सॅनिटायझर होऊनच येत असल्याने यापासून विषाणू पसरण्याची भीती मनात बाळगू नका, स्वच्छतेला महत्त्व द्या; विनाकारण घराबाहेर पडू नका, असा सल्ला देखील दिला जात आहे. 

मनात कोरोनाबाबत भीती असूनही आम्ही आमची काळजी घेऊन "लॉकडाउन'मुळे घरातच असलेल्या वाचकांना महत्त्वाच्या बातम्या वाचायला मिळाव्या, यासाठी आमच्या वाचकांसाठी कर्तव्य म्हणून वृत्तपत्र वाटपाचे कार्य अविरत सुरू आहे. 
- विलास वाणी, अध्यक्ष, जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळ 

वृत्तपत्राद्वारे कोरोना संसर्गाची भीती वाचकांमध्ये पसरली होती. यासाठी दुरावलेल्या वाचकांमध्ये वृत्तपत्र वाचनाविषयी जनजागृती करण्याचे कार्य सुरू आहे. वाचकांनी अफवांना बळी पडू नये. 
- नितीन चौधरी, उपाध्यक्ष, जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Corona Fighters: Newspaper distribution continues