जिल्ह्यात आणखी चौघे "पॉझिटिव्ह' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 एप्रिल 2020

- जिल्ह्यात एकूण सात जणांचा मृत्यू 
- बाधितांची संख्या 22 
- बांधितांमध्ये तीन पुरूष, एक महिला 
- दोन रुग्णांचा अगोदरच मृत्यू 

जळगाव : येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आलेल्या रुग्णांपैकी 52 रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. यामध्ये चार रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल "पॉझिटिव्ह' आले आहे. यात भुसावळातील तीन तर जळगावमधील जोशीपेठेतील एका रुग्णाचा समावेश आहे. बाधित चार रुग्णांमध्ये तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान, आज आढळून आलेल्या बाधित चार रूग्णांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एका रुग्णाचा तपासणीसाठी आणण्याअगोदरच मृत्यू झाला आहे. तर एका रुग्णाचा दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रुग्ण भुसावळ येथील आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील बाधित 22 रूग्णांपैकी सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 

कोरोनाचा पाचवा बळी 
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून, दुसरीकडे कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असतानाच त्यांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. रविवारी (ता. 26) अमळनेर येथील 66 वर्षीय वृद्धाचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्यानंतर रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा वृद्ध कोरोनाचा जिल्ह्यातील पाचवा बळी ठरला असून, जळगावकरांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. ज्याप्रमाणे कोरोनाबाधितांच्या संख्येत अमळनेर टॉपवर आहे, त्याचप्रमाणे मृत्यूंच्या बाबतीतही अमळनेरच जिल्ह्यात "टॉप'वर आहे. 

गेल्या चार पाच दिवसांत जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यामध्ये भुसावळमध्ये दोन, तर अमळनेरमध्ये 13 व जळगावमध्ये दोन असे एकूण 18 कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, एका जणाने कोरोनावर मात केली आहे. अमळनेर येथील शाहआलमनगरातील 43 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली होती. त्याचा अहवाल येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या त्याच परिसरातील 66 वर्षीय वृद्धाला कोरोनासदृश लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्याला 24 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी (ता. 26) एप्रिल रोजी या वृद्धाचा अहवाल "पॉझिटिव्ह' प्राप्त झाला होता. यामुळे या वृद्धाच्या कुटुंबीयांसह त्याच्या संपर्कात आलेल्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

प्रकृती बिघडल्याने मृत्यू 
शाहआलमनगरातील वयोवृद्धाचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्यानंतर त्या वृद्‌धाला आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. रात्रीच्या सुमारास या वृद्धाची प्रकृती खालावल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अधिक खालावल्याने रात्री 11 वाजेच्या सुमारास या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

मृतावर झाली होती "बायपास' 
कोरोना अहवाल "पॉझिटिव्ह' आलेल्या वृद्धाला हृदयविकाराचा आजार जडला होता. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया झालेली होती. तसेच त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. यामध्ये या वृद्धाला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

अमळनेरच "टॉप'वर 
कोरोनाबाधितांच्या संख्येत जिल्ह्यात अमळनेर टॉपवर असून, याठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या 13 इतकी आहे. यातील तीन जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला होता. रविवारी रात्री पुन्हा 66 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने अमळनेरमध्ये मृत्यूंची संख्या चारवर पोचली आहे. परिणामी अमळनेर बाधित आणि मृत्यूंमध्येही जिल्ह्यात "टॉप'वरच आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona four new case positive report one death