esakal | नंदूरबार जिल्ह्यात राज्य सीमेलगतच्या १२ ठिकाणी कोरोना तपासणी केंद्र
sakal

बोलून बातमी शोधा

नंदूरबार जिल्ह्यात राज्य सीमेलगतच्या १२ ठिकाणी कोरोना तपासणी केंद्र

प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना त्वरित उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.

नंदूरबार जिल्ह्यात राज्य सीमेलगतच्या १२ ठिकाणी कोरोना तपासणी केंद्र

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच जिल्ह्याला गुजरात राज्याची सीमा लागून असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्याचा सीमेलगतच्या गावांमध्ये १२ ठिकाणी पोलिस तपासणी केंद्रे कार्यान्वित केली आहेत. 

वाचा- अंशदायी निवृत्त पेन्शनचा प्रश्न विधानमंडळात 

दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यांतून येणाऱ्या, रेल्वेतून नंदुरबार व नवापूर स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक राहील. जिल्ह्यात येण्यापूर्वी ९६ तास आधी आरटीपीसीआर चाचणीचे नमुने घेणे आवश्यक असेल. नंदुरबार व नवापूर रेल्वेस्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशाकडे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट नसतील, त्या प्रवाशांची कोरोना लक्षणे व शरीराच्या तापमानाची तपासणी करावी. 


दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यांतून रस्ते मार्गे जिल्ह्यात येणाऱ्यांची कोरोनाची लक्षणे व शरीराचे तापमान तपासणी करावी. ज्या प्रवाशांना लक्षणे नसतील अशाच प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास मुभा असेल. लक्षणे आढळून आल्यास प्रवाशांना विलग करून ॲन्टिजेन चाचणी करण्यात येईल. अहवाल निगेटिव्ह आल्यास अशांनाच पुढे प्रवास करण्यास मुभा असेल. 
प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना त्वरित उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. होणारा खर्च प्रवाशांनी करावयाचा आहे, असे आदेशात नमूद केले आहे. 

१२ ठिकाणी तपासणी केंद्र 
गुजरात सीमेलगतच्या नंदुरबार जिल्ह्यातील १२ ठिकाणी येणाऱ्यांच्या तपासणीसाठी केंद्र कार्यान्वित केली आहेत. त्यात वाका चार रस्ता (गुजरात), केसरपाडा चौकी व कोरिट (नंदुरबार), बेडकी नाका (नवापूर), करोडम रोड (गुजरात), देवपाटनाला (शहादा), वडफळी (मोलगी), गव्हाळी नाका (अक्कलकुवा), डोडवा (तळोदा), शहाणा (शहादा), हिंगणी फाटा (सारंगखेडा), खेडदिगर (म्हसावद) यांचा समावेश आहे. त्या- त्या पोलिस ठाण्यातर्फे पोलिस पथके कार्यान्वित करून अंमलबजावणीच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिल्या आहेत.

वाचा- बनवाट दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त -

जिल्ह्यात ‘लॉकडाउन’ची परिस्थिती नाही 
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे. लॉकडाउन होण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. माझाही लॉकडाउन करण्याचा उद्देश अजिबात नाही. सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडू नये. मात्र, शासनाने आदेश दिले तर त्यांचे पालन करावे लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image