"कोरोना' लढ्यासाठी जामनेर येथे "जी. एम' हॉस्पिटल लवकरच सेवेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

जळगाव जिल्ह्यात रुग्णांना मुंबईत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य ते फाउंडेशनमार्फत करीत असतात. त्यांनी जळगाव जिल्ह्यात व मुंबईत "आरोग्यदूत' नियुक्त केले आहेत. 

जळगाव : "कोरोना' संसंर्गाविरूध्द लढ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम सुरू असलेल्या"जी.एम.' ( ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल)च्या आय.सी.यु. व वीस व्हेंटरलेटरचा विभाग येत्या चार दिवसात सुरू करण्यात येत आहे. औरंगाबादच्या डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या धर्तीवर या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. 

वैद्यकीय सेवेसाठी माजी मंत्री गिरीश महाजन व त्यांचे जी.एम.फाउंडेशन तत्पर असते. मंत्री असताना त्यांनी थेट मुंबई, पुण्याहून प्रख्यात डॉक्‍टर गावापर्यंत आणून रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली होती. त्यांचा हा पॅटर्न राज्यात इतर मंत्र्यांनी तसेच आमदारांनी अमलात आणला होता. या शिवाय जळगाव जिल्ह्यात रुग्णांना मुंबईत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य ते फाउंडेशनमार्फत करीत असतात. त्यांनी जळगाव जिल्ह्यात व मुंबईत "आरोग्यदूत' नियुक्त केले आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या धर्तीवर जामनेर येथे शंभर बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा त्यांचा संकल्प होता. जामनेर येथील दर्पण बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्याचे कामही सुरू करण्यात आले. या ठिकाणी शंभर बेडची सुविधा असणार आहे. हॉस्पिटल आणि नर्सिंग महाविद्यालय या ठिकाणी असणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तब्बल 34 बेड "आयसीयू'चे असतील. शिवाय बालरोग विभाग स्वतंत्र असणार आहे. या शिवाय तब्बल वीस व्हेंटिलेटरची सुविधा असणार आहे. या ठिकाणी मुंबई, पुणे व औरंगाबाद तसेच जिल्ह्यातील स्थानिक डॉक्‍टर सुविधा देतील. तसेच या ठिकाणी अत्याधुनिक पॅथॉलॉजी विभागही आहे. तसेच टेलिमेडिसीनची सुविधाही असणार आहे. 
याबाबत माहिती देताना माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात एक चांगले सुसज्ज असे दर्पण बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जामनेर येथे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांची नियुक्तीही केली जाणार आहे. याचे काम रात्रंदिवस सुरू असून "कोरोना' संसर्गाविरूध्द लढ्यासाठी तातडीने ते सुरू करण्यात येणार आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "Corona 'at Jamner to Fight" G. M 'Hospital in service shortly