वाढीव कालावधीतही "लॉकडाउन'चे तंतोतंत पालन करा : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

सध्या सुरू असणारा "लॉकडाउन'चा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेला आवाहन करणारे निवेदन जारी केले आहे.

जळगाव : राज्यात "लॉकडाउन' कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या वाढीव मुदतीतही प्रशासकीय नियमांचे जिल्हावासियांनी तंतोतंत पालन करावेच असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. 

नक्‍की पहा - शेतकऱ्यांसाठी पुढील महिन्यापासून कर्ज प्रक्रिया : कृषिमंत्री दादा भूसे 

सध्या सुरू असणारा "लॉकडाउन'चा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेला आवाहन करणारे निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांच्या सहकार्याने कोरोनाचा यशस्वी प्रतिकार करण्यात येत आहेत. ही लढाई आपण सर्वांच्या मदतीने जिंकणारच आहोत. आता यातील शेवटच्या टप्प्यात सर्वांना सावध राहण्याची आवश्‍यकता आहे. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात काही अपवाद वगळता जिल्ह्यातील जनतेने अतिशय संयमाने लॉकडाउनचे पालन केले आहे. पुढील दिवसांमध्येही याच प्रकारे नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला "तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' असे आश्‍वस्त केले आहे. याच प्रकारे जिल्ह्यातील जनतेची काळजी घेण्यासाठी माझ्यासह जिल्हा प्रशासन बांधील आहे. या कालावधीत आपली होणारी गैरसोय ही कमीत कमी कशी कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वांनी नियमांचे पालन केल्यास आपल्याला त्रास होणार नसल्याची ग्वाही आम्ही देत आहोत. 
 
गरजूंना मदतीचा हात 
लॉकडाउनच्या वाढीव कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईलच असे त्यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील गरजूंना प्रशासनासह खासगी संस्थात्मक पातळीवर योग्य नियोजन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या वाढीव कालावधीतही जिल्ह्यातील गरजूंना मदत केली जाणार असून पूर्वीप्रमाणेच शेतकरी हित जोपासले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona lockdown obedience gulabrao patil