मजुरांचे लोंढे गावाकडे, आरोग्य यंत्रणेचे काय... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

भुसावळ विभागात ठिकठिकाणी मजुर परतत असून, त्यांची आरोग्य तपासणी करुन, १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात रवानगी केली जात आहे. 

भुसावळ : लॉकडाऊनमुळे देशभरात मजुरीसाठी गेलेले नागरिक अडकून पडले होते. मात्र केंद्र शासनाने त्यांना आपापल्या गावी तपासणी करुन जाण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे भुसावळ विभागात ठिकठिकाणी मजुर परतत असून, त्यांची आरोग्य तपासणी करुन, १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात रवानगी केली जात आहे. 

तोंडापूरसह परिसरात १०० मजुरांचे विलिगीकरण 
तोंडापूर (ता. जामनेर) : तोंडापूरसह परिसरात सुरत येथून विट भट्यावर काम करून आलेल्या २३ मजुरांना श्री रत्नाबाई सुरेश जैन विद्यालयात विलगिकरण करण्यात आले. तोंडापूर, कुंभारी बुद्रूक, माडवे, ढालगाव, हिवरखेडा, चिचखेडा येथील मजुरांना पहुर आरोग्य केंद्रात तपासणी करुन, गावात पाठवण्यात आले. तोंडापूर येथे २३ मजुर, माडवे येथे ५०, ढालगाव १०, कुंभारी बुद्रूक १०, चिचखेडा १० मजुर सुरत येथून परत आले. ग्राम दक्षता समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषद शाळेत मजुरांचे विलगिकरण करुन, त्यांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

कुऱ्हा परिसरात अकरा जण क्वारंटाइन 
कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) : कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत बाहेरून आलेल्या १२०० नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी कुऱ्हा येथील सहा जण त्यामध्ये दोन लोक मलकापूर येथील एका खाजगी दवाखान्यातून आलेले, तर चार मालेगाव येथून आले. पिंप्राळा येथील एक व्यक्ती अबुधाबी वरून आली, चारठाण्यात एक नाशिक येथून आलेले, ईच्छापुरला एक मलकापूर वरून आलेले व इतर राज्यातून आलेले चार अशा एकुण अकरा लोकांना तपासणी करून होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तर यामधून कुऱ्हा गावच्या दोघांना तपासणीसाठी जळगाव येथे पाठविले होते. या सर्वांना कोरोनाचे लक्षणे नसल्यामुळे तपासणीनंतर १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा कालावधी संपला असून, वेळोवेळी पुर्ण तपासणी सुध्दा करण्यात आली. त्यामध्ये त्यांना काहीच त्रास नसून ते पुर्णपणे बरे असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर तोडसाम यांनी सांगितले आहे. 
 
दहिगाव येथे तपासणी 
चुंचाळे (ता. यावल) : दहिगाव (ता. यावल) येथील आदर्श विद्यालयातील विलगीकरण कक्षात परराज्यातून व परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व वैद्यकीय पथकाकडून करण्यात आली. विलगीकरण कक्षात असलेल्या २२ स्त्री, व पुरुषांची तपासणी करण्यात आली व क्वारनटाइचा शिक्का मारण्यात आले. यावेळी गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, ६० वर्षावरील व्यक्ती, लहान मुले असलेली माता व गरोदर माता, अशांना १४ दिवसासाठी होम क्वारंटाइन करण्यात आले. तर बाकीच्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona Londhe of laborers towards the village, what about the health system ...