लढा कोरोनाशी...आयुर्वेद, योगा देतात मनःस्वास्थ्याचा मंत्र 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

संयम राखत योग आणि आयुर्वेदात सांगितलेली जीवनशैली, नियम, आहार-विहार अंगीकारले, तर निरोगी शरीरासह मानसिक स्वास्थ्यही कायम राहील, असा गुरुमंत्र योग आणि आयुर्वेदातील तज्ज्ञांनी दिला आहे. 

जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिन्यापासून देशव्यापी लॉकडाउन सुरू झाले आणि आपल्याच घरात आपण कैदी झालो. कुटुंब, समाज आणि राष्ट्रहितासाठी हे आवश्‍यक असले, तरी सारखं घरात थांबून अनेकांमध्ये मानसिक तणावाचे प्रकारही समोर येत आहेत. अशा स्थितीत संयम राखत योग आणि आयुर्वेदात सांगितलेली जीवनशैली, नियम, आहार-विहार अंगीकारले, तर निरोगी शरीरासह मानसिक स्वास्थ्यही कायम राहील, असा गुरुमंत्र योग आणि आयुर्वेदातील तज्ज्ञांनी दिला आहे. 

क्‍लिक करा - न्यायालयात युक्‍तिवाद तो देखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे

जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाने थैमान घातलेले असताना भारतातही 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन सुरू झाले. त्या दिवसापासून पूर्ण देशाची चाके थांबली आहेत. अत्यावश्‍यक व आपत्कालीन सेवा वगळता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी संस्था, कंपन्या, उद्योग, व्यापार, व्यवसाय, सर्व प्रकारची प्रतिष्ठाने बंद आहेत. जागतिक आरोग्य संघटना व सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व भारतीयांना घरातच राहण्याची सक्तीही करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढविणे हा चांगला पर्याय दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर योग, आयुर्वेदातील तज्ज्ञांशी "सकाळ'ने चर्चा केली असता, त्यांनी निरोगी शरीर, मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी मंत्र दिले...  

आयुर्वेदातील जीवनशैली आदर्श 
डॉ. जयंत जहागीरदार (आयुर्वेद तज्ज्ञ)
: निरोगी शरीरासाठी आयुर्वेदात "स्वस्थ वृत्ता'चा मंत्र दिला आहे. नियमित ध्यानधारणा, अभयमुद्रा, शवासनासारखे अनेक प्रकार दिले आहेत. लॉकडाउनमुळे कुटुंबातील सर्वच सदस्य घरात असल्याने प्रत्येकाजवळ या गोष्टी करायला भरपूर वेळ आहे. वेळेवर जेवण, वेळेवर झोपणे, वेळेत उठणे, नियमित प्राणायाम, योगातील काही आसने या बाबी आवर्जून करायला हव्यात. सद्यःस्थितीत सर्वत्र कोरोनाच्या बातम्या डोक्‍यावर आदळत असताना झोपताना किमान चांगले काहीतरी वाचून झोपावे. डोक्‍यावर, तळ हाता-पायाला ब्राह्मतेलाची मालिश, गायीचे कोमट तूप नाकात सोडणे केव्हाही उत्तम. आहारातही उडीद, मुगाचे प्रमाण वाढविले पाहिजे. पचायला हलके पदार्थ या दिवसांत खावे. जुन्या तांदळाचा थोडा भात, ज्वारीच्या लाह्या खाव्यात. कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारतीय संस्कृती, आजी-पणज्यांनी लावलेल्या चांगल्या सवयी या कामी येणार आहेत. 
 
व्यायाम, आहार, चांगले वाचन 
डॉ. सुभाष वडोदकर (आयुर्वेद तज्ज्ञ)
: शरीर सुदृढ असले, की मानसिक आरोग्यही टिकून राहते. सध्याचा काळ मोठा कठीण असला, तरी या दिवसांत मानसिक स्वास्थ्यासह रोगप्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदाचा भर जीवनशैलीवर अधिक आहे. "लवकर निजे, लवकर उठे...' असे आपण नेहमी म्हणतो, प्रत्यक्षात तसे वागत नाही. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या एक तास आधी उठणे चांगले. अशा काळात शरीराच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. मात्र, सोबतच सूर्यनमस्कार, प्राणायाम, मंत्रजप यासारख्या गोष्टी केल्यास आरोग्यातील दारिद्य्र दूर होते. त्यातून सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. आहारात अपचन करणारे पदार्थ टाळावे. संतुलित, पचायला हलका आहार करावा. औषधीद्रव्य म्हणून मिरे, धने, ओवा टाकलेला काढा प्यावा. उकळलेले पाणी पिणे उत्तम. 
 
प्राणायाम, ध्यानधारणा हवी 
हेमांगिनी सोनवणे (योगतज्ज्ञ, मार्गदर्शक)
: सध्याचा काळ कठीण असला तरी जो शरीराने, मनाने स्वस्थ आहे तो आजारांवरही मात करू शकेल. या काळात तर जगानेही योगाला स्वीकारले आहे आणि त्या माध्यमातून त्याचा प्रचार व प्रसारही सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग ओळखण्यासाठी तज्ज्ञ आपल्या श्‍वसनसंस्थेची स्वतःच तपासणी करायला सांगतात. योग, आयुर्वेदात श्‍वासोच्छ्वासाला खूप महत्त्व आहे. कपालभाती, प्राणायामसारखे व्यायाम आपली श्‍वसनप्रक्रिया अधिक मजबूत करतात. अर्थात, हे व्यायाम प्रकारही कुणी करावे, कुणी करू नये हा भाग आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच ते केले पाहिजे. डॉक्‍टर जसे तीन वेळच्या गोळ्या-औषधी लिहून देतात, त्याचप्रमाणे दैनंदिन तीन वेळा ध्यानधारणा करावी, त्यातून मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते. 

योगा करा, छंद जोपासा 
डॉ. अनिता पाटील (योगतज्ज्ञ)
: मनाचे स्वास्थ्य शरीरावर अवलंबून असते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्याला प्राधान्यक्रम दिला पाहिजे. सध्या सर्वच जण घरी असल्याने बाहेर जाऊन व्यायाम, जीम, योगाचे वर्ग बंद असतील. पण, सरकारच्या निर्देशानुसार, आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येकाने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल केले पाहिजे. आहार- विहाराचे नियम स्वतःसाठी घालून घ्या. वेळेत झोपणे, वेळेवर उठणे, वेळेवर आहार करणे, या सोबतच सूर्यनमस्कार, ध्यानधारणा, प्राणायाम, कपालभाती या मूलभूत बाबी नियमित कराव्यात. लहान मुलांनाही कंटाळा येत असेल, पण त्यांनी निराश न होता आपले छंद जोपासावे. चांगली इतिहासाची पुस्तके वाचावी, घरगुती खेळ खेळावेत. या बाबी नियमित केल्यास अंतर्गत व बाह्य अशा दोन्ही स्तरावर आपल्यांत सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus fight aayurved and yoga