जळगावात आणखी दोन कोरोना पॉझिटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून जळगावात देखील याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुक्‍त झालेल्या जळगावात तीन दिवसात तीन पॉझिटीव्ह रूग्ण आल्याने प्रशासन हादरले आहे.

जळगाव : येथील कोविड रुग्णालयात काल घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांपैकी दोन रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जळगावात एकूण रूग्णांची संख्या तीन झाली आहे. आज प्राप्त अहवालातील दोघे अमळनेर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने जिल्हा आता हादरला आहे. 

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून जळगावात देखील याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुक्‍त झालेल्या जळगावात तीन दिवसात तीन पॉझिटीव्ह रूग्ण आल्याने प्रशासन हादरले आहे. कोरोना रूग्णालयात आज प्राप्त झालेल्या अहवालापैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या कोरोना बाधित रुग्णांपैकी एका 52 वर्षीय महिलेचा कालच (ता.20) रुग्णालयात मृत्यू झाला होता. तर दुसरा रुग्ण हा त्या महिलेचा पती असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे. 

लॉकडाउनचे पालन करा 
कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत असून नागरिकांनी घाबरून न जाता अधिक जबाबदारीने लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे. तसेच घरातच रहावे; कोणीही विनाकारण बाहेर पडू नये. जेणेकरून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. तर जिल्हावासियांनी स्वतः ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. गर्दी टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये. मीच माझा रक्षक ही भूमिका अंगी बाळगून घरातच राहण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus two positive report today