जिल्ह्यात कोरोनाचे द्विशतक; तुम्ही कधी सुधारणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मे 2020

 जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 209 झाली असून त्यापैकी एकोणतीस व्यक्‍ती कोरोनामुक्‍त होऊन घरी गेल्या आहेत. तर 25 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता तरी विनाकारण घराबाहेर पडू नका, अत्यावश्‍यकतेसाठी बाहेर पडलेच, तर फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करा. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, पाचोरा अशी मजल दर मजल करीत कोरोनाने आज चाळीसगाव जवळच्या भडगाव तालुक्यात धडक दिली. सुदैवाने चाळीसगाव तालुक्यात अद्यापपर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र, शहरातील बाजारात विशेषतः दुपारी एकपर्यंत जी गर्दी होते, ती पाहता कोरोनाचे कोणालाही गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे चाळीसगावकरांनो, तुम्ही कधी सुधारणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सध्या ‘लॉकडाऊन’ व संचारबंदी केलेली आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवांमध्ये येणाऱ्या मेडिकल, किराणा, भाजीपाला, दूध यासह कृषी केंद्रांना परवानगी दिलेली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात दररोज सकाळी आठपासून दुपारी दोन पर्यंत इतरही अनेक दुकाने सुरू असतात. या दुकानांवर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडते. ‘मास्क’ लावण्यासह ‘फिजीकल डिस्टन्सिंग’चे पालन करणे गरजेचे असताना एकाही दुकानावर त्याचे पालन केले जात नाही. चाळीसगाव शहरातील घाट रोडवर सकाळी नऊ ते दुपारी बारा या तीन तासात साधी दुचाकी देखील लवकर जाऊ शकत नाही, इतकी गर्दी या ठिकाणी होत असते. दुकानदारांकडे खरेदीसाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील ग्राहकांची चारचाकी वाहने, मालाची वाहने, दुचाकी वाहने सर्रास भर रस्त्यावरही लावलेली असतात. 

‘फिजीकल डिस्टन्सिंग’चा फज्जा 
अनेक दुकानदारांनी ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राखले जावे म्हणून उपाययोजना केलेल्या असतानाही ग्राहकच इतकी गर्दी करतात, की ‘फिजीकल डिस्टन्सिंग’चा अक्षरशः फज्जा उडालेला असतो. अशा परिस्थितीत प्रशासनाकडूनही कुठल्याच ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. आजपर्यंत एकदाही प्रांताधिकारी किंवा तहसीलदार रस्त्यावर उतरलेले नाहीत. केवळ पोलिसच तेवढे त्यांचे कार्य करताना दिसतात. मात्र, लोकच ऐकत नसल्याने त्यांनी देखील आता हात टेकले आहेत. शहरात गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांना जागा ठरवून दिलेल्या असतानाही कोणी कुठेही हातगाड्या लावताना दिसतात. बहुतांश विक्रेते ‘मास्क’ही लावत नाही. त्यामुळे नागरिकांनीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नियमांचे पालन करणे तालुक्यासाठी हिताचे ठरणार आहे. 

अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष 
एकीकडे गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या जुगारांच्या अड्ड्यांवर मात्र दररोज गर्दी होत असते. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. समाजातील सुज्ञ नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्याची दखलच घेतली जात नसल्याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. अशीच परिस्थिती गुटखा विक्री करणाऱ्यांच्या बाबतीत आहे. पोलिसांनी गुटखा विक्रेत्यांशी निर्माण केलेल्या आर्थिक हितसंबंधांमुळे संपूर्ण तालुक्यात सर्रास गुटखा विकला जात आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होणाऱ्या शहरासह तालुक्यात सर्रास सुरू असलेले अवैध धंदे देखील तितकेच जबाबदार ठरू शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Corona's double century in the district; When will you improve?