जळगाव मनपाचे दवाखाने कात टाकणार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर भारती सोनवणे यांच्याकडून वेळोवेळी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार आमदारांना ५० लाखांचा निधी आरोग्य सेवेवर खर्च करण्याचे सुचविले आहे

जळगाव : शहर मनपाचे सर्व दवाखाने लवकरच कात टाकणार असून महापौर भारती सोनवणे यांनी त्यादृष्टीने नियोजन केले आहे. आ.चंदुभाई पटेल व आ.राजुमामा भोळे यांच्या ५०-५० लाखांच्या निधीतून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व साहित्य लवकरात लवकर खरेदी केले जाणार आहे. महापौर यांनी मनपा आयुक्तांशी देखील याविषयी चर्चा केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर भारती सोनवणे यांच्याकडून वेळोवेळी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार आमदारांना ५० लाखांचा निधी आरोग्य सेवेवर खर्च करण्याचे सुचविले आहे सुचविले आहे. महापौर भारती सोनवणे यांनी आमदारांकडून मिळणारा निधी जळगाव मनपाच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी खर्च करण्याचे नियोजन केले. याकामी मनपाचे डॉ.राम रावलानी व डॉ.राधेश्याम चौधरी यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. या नियोजन बैठकीला स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन सनकत, किशोर चौधरी, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, उपायुक्त अजीत मुठे, डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.राम रावलानी आदी उपस्थित होते. 

हे साहित्य खरेदी करणार
डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.राम रावलानी यांनी सुचविलेल्या साहित्यामध्ये एन 95 मास्क 3000, ट्रिपल लेयर मास्क 50000, ग्लोज 10000, पीपीई किट 1000, हेड कॅप 3000, पल्स ऑक्सीमीटर 8, बीपी एपरेट्स 10, डेटॉल, सेवलोन सोल्युशन 10, सोडियम क्लोराइड, ब्लिचिंग पावडर, फिनाईल, एक्स रे मशीन 2, इन्फ्रारेड थर्मामीटर 2, मल्टीपल मॉनिटर 4, ऑटोमॅटिक सेल काउंटर 1, आयसीयू बेड 5, फावलर बेड 10, ऑक्सिजन सिलेंडर 5, कसाईड लॉकर्स 20, कोविड संबंधित उपयुक्त औषधी, प्लास्टिक गाऊन्स हे साहित्य खरेदी केले जाणार आहे. मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी यांच्याशी याबाबत महापौर भारती सोनवणे यांनी चर्चा केली असून लवकरच याबाबत जाहिरात काढून साहित्य खरेदी केले जाणार आहे.

जळगावकरांचे आरोग्य रक्षण करण्यास कटिबद्ध : महापौर
जळगाव शहरातील ५ लाख लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यास जळगाव मनपाचे दवाखाने मजबुतीने व आत्मविश्वासाने रक्षण करण्यास प्रशासन कटिबद्ध आहे. जळगावात वैद्यकीय साधन सामुग्री कमी पडणार नाही अशी ग्वाही महापौर भारती सोनवणे यांनी दिली आहे. मनपा रुग्णालयांचे सक्षमीकरण तसेच आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर्स व कर्मचारी यांचे मनोबल उंचावून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलण्याचे प्रस्तावित करण्यात येत असल्याचे महापौर यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation hospital corona despenciry planning mayer