"त्या' मृत्यूदाखल्यामुळेच अमळनेरवर संकट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 एप्रिल 2020

तिच्या अंत्ययात्रेतही नातेवाईक सहभागी झाले आणि अमळनेरवर कोरोनाचे संकट ओढवले. यामुळे आता त्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी जळगाव महापालिका आरोपीच्या पिंजऱ्यात उभी ठाकली आहे. 

जळगाव . अमळनेरमधील साळीवाड्यातील महिलेचा कोरोनाचा अहवाल "पॉझिटिव्ह' येण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेला न्यूमोनिया झाल्याचे कारण सांगून जळगाव महापालिकेने मृत्यू दाखला व मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळेच तिच्या अंत्ययात्रेतही नातेवाईक सहभागी झाले आणि अमळनेरवर कोरोनाचे संकट ओढवले. यामुळे आता त्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी जळगाव महापालिका आरोपीच्या पिंजऱ्यात उभी ठाकली आहे. 

अमळनेर तालुक्‍यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असल्याने हा तालुका "हॉट स्पॉट' म्हणून ठरला आहे. अमळनेरमधील साळीवाड्यातील दांपत्याला कोरोनासदृश लक्षणे जाणवत असल्याने त्यांना 18 एप्रिलला रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेला श्‍वसनाचा त्रास अधिक होत असल्याने त्या महिलेचा 19 एप्रिलला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या महिलेचा कोरोनाचा अहवाल प्रलंबित होता. मात्र, त्यापूर्वीच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या महिलेचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला, असा शेरा असलेला मृत्यूदाखला कुटुंबीयांना देवून त्या महिलेचा मृतदेह त्यांच्याकडे स्वाधीन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मृत्यूदाखल्यानंतर अंत्यसंस्कार 
साळीवाड्यातील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत अमळनेर नगरपालिकेतर्फे जळगाव महापालिकेला विचारणा करण्यात आली होती. यावेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्या महिलेचा मृत्यू कोरोनामुळे नाही, तर न्यूमोनियामुळे झाला असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे स्थानिक प्रशासनही "पॉझिटिव्ह' महिलेच्या अंत्ययात्रेबाबत काही कार्यवाही करू शकले नाही आणि त्यावेळी संपर्कात आलेल्यांपैकी काहींचे अहवाल "पॉझिटिव्ह' मिळाले आहेत. परिणामी या संख्यावाढीला महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation hospital death certificate nimoniya