कापूस विक्रीसाठी जिल्ह्यातील 3334 शेतकऱ्यांना टोकन- जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी आजपर्यंत 37020 शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे. आतापर्यंत तीन हजार 334 शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 

जळगाव ः जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी आजपर्यंत 37020 शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे. आतापर्यंत तीन हजार 334 शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. विभागीय कार्यालय, जळगाव यांनी वेळोवेळी केलेल्या विनंतीनुसार जिल्ह्यात पणन महासंघाचे धरणगाव, कासोदा, (एरंडोल) अमळनेर, पारोळा, दळवेल (पारोळा) भडगाव असे एकूण सहा केंद्र असून, या केंद्रांमध्ये एकूण 9 जिनिंग-प्रेसिंगमध्ये कापूस खरेदी केंद्र नियोजित आहेत. 
सद्यःस्थितीत पणन महासंघाचे धरणगाव, कासोदा (एरंडोल) व पारोळा या केंद्रावरील 7 जिनिंग-प्रेसिंगमध्ये कापूस खरेदी खरेदी केंद्र असून, या केंद्रांवर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे आवक झालेल्या कापसाची प्रतवारी निश्‍चित करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर एक प्रतवारीकार (ग्रेडर) उपलब्ध आहेत. 
सद्यःस्थितीत कापसाची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रेडरची संख्या वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कापूस खरेदीवेळी शेतकऱ्यांच्या अडचणींचे निवारण व मार्गदर्शनासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांची/कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. 

आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय, बाजार समितीनिहाय संख्या तसेच टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी अशी 
जळगाव तालुका-शेतकरी संख्या-2230(180),चाळीसगाव-शेतकरी संख्या-2403, भुसावळ-शेतकरी संख्या-1175 (170), मुक्ताईनगर- बोदवड-शेतकरी संख्या-3367 (184), जामनेर-शेतकरी संख्या-7 हजार (150), पाचोरा-भडगाव-शेतकरी संख्या-3500, (60), एरंडोल-धरणगाव- शेतकरी संख्या-5275 (980), पारोळा-शेतकरी संख्या-7200 (1463), अमळनेर-शेतकरी संख्या-2650, रावेर-शेतकरी संख्या-552, चोपडा-शेतकरी संख्या-1668 (147), अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण 11 बाजार समित्यांमध्ये 37 हजार 20 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 334 शेतकऱ्यांना टोकनही देण्यात आले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon for cotton selling token given to farmer