गतवर्षीपेक्षा दोन लाख गाठींचे उत्पादन कमी! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

शेतकरी अजूनही कापूस विक्रीसाठी काढत नाहीत. जादा भाव मिळेल, अशी त्यांना आशा आहे. यंदा कापसात ओलावा असल्याने दर्जा हवा तसा नाही. यामुळे व्यापारीही जादा दर देऊ शकणार नाहीत. परदेशातून कापसाला मागणी वाढल्यास दर वाढू शकतील. 
- अविनाश काबरा, सदस्य, कॉटन फेडरेशन ऑफ इंडिया 

जळगाव : जिल्ह्यात कापसाला "पांढरे सोने' अशी उपमा आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी कपाशीचा पेरा अधिक करतात. यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीने कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन कमी झाले. जिनिंग उत्पादकांकडे हवा त्या प्रमाणात कापूस न आल्याने खानदेशात जिनिंग उद्योगात गतवर्षीपेक्षा तब्बल दोन लाख गाठींची निर्मिती कमी झाली आहे. 

नक्‍की पहा - बुलेट ट्रेनमधून जाण्याचे जळगावकरांचे स्वप्न होणार पुर्ण

दिवाळीपर्यंत यंदा चांगला पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन चांगले येईल. कापसाचे उत्पादन होऊन शेतकऱ्यांची "चांदी' होईल, असे चित्र होते. मात्र, दिवाळीनंतर पावसाने जोर पकडला, तो संततधार सुरूच राहिला. अतिवृष्टी होऊन हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. कपाशीसह उडीद, मूग, ज्वारी, मका या पिकांचे नुकसान झाले. कपाशीची बोंडे काळी पडली. अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाले. खरिपाचे उत्पादन अतिवृष्टीत गेले. 
जो कापूस शेतकऱ्यांकडे आला, त्यात ओलावा होता. यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी कापसाला 5100 ते 5200 रुपयांपर्यंत भाव दिला. दुसरीकडे शासनाने कापसाला 5450 ते 5500 रुपये असा दर दिला. मात्र, शासनाने ओलावा असलेला कापूस खरेदी करण्यास नकार दिला. यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे मिळेल त्या दरात कापूस देणे भाग पडले. 
अजूनही व्यापाऱ्यांकडे अधिक भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस काढलेला नाही. यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा तब्बल दोन लाख गाठींची निर्मिती कमी झाली आहे. गतवर्षी नऊ लाख गाठी तयार झाल्या होत्या. यंदा सात लाख गाठी तयार झाल्या आहेत. खानदेशात जिनिंग उद्योग सुरू आहेत. मात्र, चोवीस तास सुरू न राहता केवळ आठ ते दहा तास जिनिंग सुरू राहतात. कापसाची बाजारातील आवक वाढली, तर गाठी अधिक तयार होतील. 

 
"कोरोना'मुळे चिनी बाजार बंद 
चिनी बाजारपेठेत कापसाला मागणी असते. मात्र, तेथे "कोरोना' व्हायरसमुळे बाजारपेठा बंद आहेत. यामुळे तेथील बाजारपेठ ठप्प झाली आहे. त्यामुळे खानदेशातूनही कापसाच्या गाठींना मागणी होत नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cotton two lakh gathi loss production