आनंदाची बातमी...पीक कर्जफेडीला 31 मेपर्यंत मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

रिझर्व्ह बॅंकेने शेती कर्जाच्या परतफेडीसाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जळगाव जिल्हा बॅंक अंमलबजावणी करीत आहे. 

जळगाव ः "कोरोना व्हायरस'मुळे सर्वत्र लॉकडाउन आहे. या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार जळगाव जिल्हा बॅंकेने सर्व शेतकऱ्यांना पीककर्जाच्या परतफेडीस 31 मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून 31 मार्च समजला जातो. यंदा "कोरोना'मुळे सर्वच आर्थिक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. "कोरोनो'चा संसर्ग होऊ नये, यासाठी "लॉकडाउन'चे आदेश आहेत. शेतकऱ्यांनी जर बॅंकेत येऊन कर्जाची परतफेड केली तर त्यांनाही संसर्गाची भीती असल्याने रिझर्व्ह बॅंकेने शेती कर्जाच्या परतफेडीसाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जळगाव जिल्हा बॅंक अंमलबजावणी करीत आहे. 

अल्प मुदतीची पीककर्जे 
बॅंकेने संमत केलेल्या प्रचलित पीककर्ज धोरणानुसार 2019-20 खरीप पिकासाठी असलेली कर्ज परतफेडीची अंतिम मुदत 31 मार्चऐवजी आता 31 मे 2020 असेल. 2019-20 या हंगामासाठी हा बदल आहे. 

मध्यम मुदतीचे शेतीकर्ज 
ज्या मध्यम मुदत शेतीकर्जाचे हप्ते 1 मार्च ते 31 मे 2020 या कालावधीत वसूल पात आहेत. अशा कर्ज हप्त्यांना या तारखेपासून 3 महिन्यांचा सवलतीचा कालावधी देण्यात येत आहे. या कर्जाचा उर्वरित परतफेड कालावधी 3 महिन्याने वाढविण्यात येईल. मात्र, कर्ज खात्याचे येणे बाकीवर व्याज आकारणी करण्यात येईल. 

शेतकऱ्यांना कर्जफेडीस 31 मेपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. सर्व प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी या कर्ज परतफेड बदलाच्या तारखेची माहिती शेतकऱ्यांना देऊन शाखेत नोटीस बोर्ड लावावेत. 
- जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, 
जळगाव जिल्हा सहकारी बॅंक. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Crop loan deadline up to May 31