बॅंकांमध्ये गर्दी...सोशल डिस्टन्स, लॉकडाऊनचा उडाला फज्जा !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

शहरातील कोणत्याही बॅंकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवले जात नाही. नागरिक एकापाठोपाठ एक उभे आहेत. यामुळे "कोरोना' चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता वाढली आहे. 

जळगाव : शहरासह देशभरात लॉकडाऊन आहे. संचारबंदीचे आदेश आहेत. असे असताना शहरात मात्र आज अनेक नागरिक वाहनांनी, पायी फिरताना आढळून आले. अनेक बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्स कोठेही दिसून आला नाही. नागरिक मनाला वाटेल त्याप्रमाणात रस्त्यावर ये-जा करताना आढळून आले. जणूकाही लॉकडाऊन उघडल्याचा अनुभव आज आला. 

"कोरोना'चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या 23 मार्चपासून जळगावसह देशभरात लॉकडाऊन आहे. अत्यावश्‍यक सेवांना त्यातून वगळण्यात आले आहे. बॅंकांमध्ये ग्राहकांना सोशल डिस्टन्स ठेवून उभे राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र शहरातील कोणत्याही बॅंकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवले जात नाही. नागरिक एकापाठोपाठ एक उभे आहेत. यामुळे "कोरोना' चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता वाढली आहे. 

"जनधन'चे पैसे काढण्यासाठी गर्दी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांनी विविध बॅंकांत सुरू केलेल्या जनधन अकौंटमध्ये पाचशे रुपये जमा केल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी करण्यात आली. रविवारी (ता.5) व सोमवारी (ता.6) बॅंकांना सुटी होती. आज मात्र असंख्य महिलांनी विविध बॅंकांमध्ये पासबुक घेऊन पाचशे रुपये काढण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. 

गर्दी गर्दी आणि गर्दीच... 
अनेक महिला संबंधित बॅंकांमध्ये घोळक्‍या घोळक्‍याने बॅंकेत येत होत्या. त्यांच्याकडे बॅंकेच्या जनधन खात्याचे पास बुक होते. पोलिसांनीही त्यांना घोळक्‍या घोळक्‍याने जाऊ नका, लांब अंतर ठेवून जा असे सांगितले नाही. 
बॅंकांनीही या महिलांना कोरोना बाबत काळजी घेण्यास सांगितले नसल्याचे चित्र होते. म्हणूनच त्या महिला अगदी एकमेकांजवळ उभ्या होत्या. 
शहरातील युनियन बॅंक, महाराष्ट्र बॅक, बॅंक ऑफ बडोदा, सिंडिकेट बॅंक, स्टेट बॅंक आदी बॅंकांमध्ये महिलांसह नागरिकांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. 

शहरात सर्वत्र वाहतूक 
शहरात सर्वत्र दुचाकी, चारचाकी वाहने सर्रास ये-जा करीत होती. पोलिस कोठेही त्यांना अडवित नव्हते. जशी शहरात संचारबंदी नसल्याचा अनुभव येत होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Crowds in the banks ... Social Distance, Lockdown blow out!