फिटनेस मंत्रा : मधुमेहींसाठी आहारासह व्यायाम, शांतता गरजेची 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी किमान या काळात तरी योग्य आहार, व्यायाम आणि तणावमुक्त राहणेच उत्तम राहील, असे मधुमेह व मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. शशिकांत गाजरे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

जळगाव : "कोरोना व्हायरस'ची लागण कोणालाही होण्याची शक्‍यता आहे. त्यात शरीरातील रोगप्रतिकारक शक्‍ती कमी असलेल्यांना "कोरोना'ची लागण लवकर होऊन त्यात मृत्यू होण्याची शक्‍यता अधिक आहे. आतापर्यंत समोर आलेल्या "केस'मध्ये मधुमेह, हृदयविकाराचा त्रास असलेल्यांची संख्या अधिक आहे. यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी किमान या काळात तरी योग्य आहार, व्यायाम आणि तणावमुक्त राहणेच उत्तम राहील, असे मधुमेह व मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. शशिकांत गाजरे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

"कोरोना व्हायरस'चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आतापर्यंत साठ वर्षे पार केलेले वृद्ध, तसेच हृदयविकार, मधुमेह यांसारखे आजार असलेल्यांना याची लागण होत असल्याचे चित्र होते; परंतु सद्यःस्थितीत तरुणांनाही याची लागण होऊ लागली आहे. मुळात रोगप्रतिकारक शक्‍ती कमी असलेल्यांचा "कोरोना'मुळे मृत्यू होत आहे. ज्यांची प्रतिकारशक्‍ती चांगली आहे, ते यातून बरे होत आहेत. यामुळेच मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी "कोरोना व्हायरस'ची सावधानता म्हणून काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. त्याअनुषंगाने व्यायाम, जेवणाची शिस्त आणि ताणतणावावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. 

त्रिसूत्री महत्त्वाची 
मुळात मधुमेह असलेल्यांची प्रतिकारशक्‍ती कमी झालेली असते. यामुळे कोणत्याही आजाराची लागण, त्यात "कोरोना व्हायरस'ची लागण लवकर होण्याची शक्‍यता असते. मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी आरोग्याच्या दृष्टीने त्रिसूत्री कायम पाळणे आवश्‍यक आहे. यात प्रामुख्याने समतोल आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि ताणतणावावर नियंत्रण ठेवून शांत राहणे, ही त्रिसूत्री जपली पाहिजे. 

मधुमेही रुग्णांसाठी... 
- हिरवा भाजीपाला, कडधान्य, फळे खाणे. 
- पांढऱ्या वस्तू ः तांदूळ, साखर, तांदळाचे पीठ, मक्‍याचे पीठ खाणे टाळावे. 
- जेवणाची शिस्त आवश्‍यक. 
- नियमित व्यायाम ः गच्ची किंवा घराच्या आवारात किमान अर्धा तास चालणे. 
- तणावावर नियंत्रण 
- निवांत, पुरेशी झोप घेणे. 

सामान्य नागरिकांसाठी... 
- रोज चांगला आहार घेणे. 
- सकाळी नियमित व्यायाम. 
- पुरेशी झोप घ्यावी. 
- जास्त ताण घेणे टाळावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon diabetes corona virus health fitness