दूध खरेदी दरात वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

अतिवृष्टीमुळे चारा पूर्णपणे खराब झालेला असल्यामुळे दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. संकलनात घट झाली आहे. गुजरात राज्यातील बलसाड, भरूच, खेडा व सुरत जिल्ह्यातील दूध संघानी व खासगी व्यापाऱ्यांनी जिल्ह्यात जास्त भाव देवून खरेदी सुरू केली आहे.

जळगाव : जिल्हा दूध संघातर्फे गाय व म्हैस दूध खरेदी दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. म्हशीचे दूध एका लिटरसाठी 41.10 तर गायीचे दूध एका लिटरसाठी 31.60पैशाने खरेदी करण्यात येणार आहे. उद्या (ता.1)पासून हे दर लागू करण्यात येणार आहे. 

क्‍लिक करा - जिल्ह्यात लवकरच केळी संशोधन विकास महामंडळ : गुलाबराव पाटील  

याबाबत जिल्हा दूध उत्पादक संघाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कि या वर्षी अतिवृष्टीमुळे चारा पूर्णपणे खराब झालेला असल्यामुळे दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. संकलनात घट झाली आहे. गुजरात राज्यातील बलसाड, भरूच, खेडा व सुरत जिल्ह्यातील दूध संघानी व खासगी व्यापाऱ्यांनी जिल्ह्यात जास्त भाव देवून खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे उत्पादक सोसायट्यांना दूध न देता बाहेर विक्री करीत आहेत. त्यामुळे संघाने गाय व म्हैस दूध दरात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडलाच्या सभेत घेण्यात आला आहे. म्हशीचे दूध 6.0 फॅट व 9.0 एस.एन.एफ.साठी 685किलो फॅट व एका लिटरसाठी 41.10 पैसे दर असेल. तर गाय दूधासाठी 3.5फॅट व 8.5 एस.एन.एफ साठी रूपये 263.33 प्रति किलो घटक एका लिटरसाठी 31.60 पैसे दर असेल. 

पशुखाद्य विक्री दरात घट 
पशुखाद्य विक्री दरातही घट करण्यात आली आहे, मिल्क रेशन कांडी 22,500 रूपयावरून 21,000रूपये म्हणजे एका किलोसाठी 1.50 पैसे दर कमी करण्यात आला आहे. तर हाय एनर्जी /बाय पास प्रोटीन 24,500 मात्र वरून 23.000रूपये म्हणजे एक किलोसाठी 1.50 पैसे दर कमी करण्यात आला आहे.जिल्ह्यातील सर्व प्राथमिक दूध संस्थांनी दूध संघात जास्तीत जास्त दूध पुरवठा करून संघास सहकार्य करावे असे अवाहन चेअरमन मंदाकिनी खडसे व संचालक मंडळाने केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district dudh sangha milk rate Increase farmer