जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश...खासगी दवाखाने बंद ठेवू नका 

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश...खासगी दवाखाने बंद ठेवू नका 

जळगाव  : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्‍टरांची भूमिका महत्त्वाची आहे. समाजाने डॉक्‍टरांना देवदूताची उपमा दिली आहे. शहरातील काही खासगी रुग्णालये बंद असल्याने नागरिकांना उपचार मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे डॉक्‍टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नये असे आदेश जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी दिले आहे. 

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाउन आहे. याबाबत जिल्हास्तरावर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे यांचेसह सर्व अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, लॉकडाउनच्या काळात अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कारणांसाठी नागरिक व खासगी वाहने रस्त्यावर येऊ देवू नये. अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यास अडथळा होणार नाही, याची काळजी पोलिस विभागाने घ्यावी अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 

गैरसोय करणाऱ्यांचा अहवाल पाठविणार 
देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या काळात जे खासगी डॉक्‍टर दवाखाने बंद ठेवून रुग्णांची गैरसोय करतील त्यांचा अहवाल इंडियन मेडिकल असोसिएशनला पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

तातडीने औषधांची खरेदी करावी 
जिल्ह्यात कुठेही औषधांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. आवश्‍यकता भासल्यास आरोग्य विभागाने तातडीने औषधांची खरेदी करावी. जीवनावश्‍यक वस्तूंचा सध्याजरी तुटवडा नसला तरी भविष्यातही होऊ नये यासाठी आवश्‍यक ते नियोजन पुरवठा विभागाने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. 

जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांना पासेस 
फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी एकाच ठिकाणी विक्रीस न बसता हातगाडीवर चौकाचौकात व कॉलनीमध्ये जाऊन विक्री करावी. जेणेकरून खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना परिवहन विभागाने अत्यावश्‍यक सेवेचे पासेस द्याव्यात. 

किमान पाचशे बेड आवश्‍यक 
जिल्ह्यात लॉकडाउनच्या काळात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यात किमान 500 बेड आवश्‍यक त्या सोयीसुविधांसह तयार ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालये लॉकडाउनच्या काळात बंद राहणार नाही याची सर्व संबंधितांनी काळजी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com