रुग्णांसाठी डॉक्‍टरांनी घालून दिले वेळेचे बंधन 

doctor
doctor

जळगाव : सध्या संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटावर डॉक्‍टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु, शहरातील काही हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता काही ठिकाणी ओपीडी सुरू असली, तरी नियोजित वेळापत्रकात बदल करून ठराविक वेळ रुग्णांना देण्यात आली आहे. काही हॉस्पिटलमध्ये मुख्य डॉक्‍टरच तपासणीला येत नसल्याचे दिसून आले. अशा डॉक्‍टरांनी रुग्णांशी एका अर्थाने असहकारच पुकारला आहे. यामुळे, रुग्णांची गैरसोय तर होतच आहे, शिवाय दाखल रुग्णांची संख्याही रोडावली दिसून येत आहे. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात "लॉकडाउन' सुरू असून जीवनावश्‍यक वस्तू, आपत्कालीन सेवा वगळता सर्व व्यवहार, व्यवसाय, सेवा बंद आहेत. वैद्यकीय सेवेला त्यातून वगळले असले, तरी 24 मार्चपासूनच जळगाव शहरातील बहुतांश खासगी हॉस्पिटल बंद आहेत. याबाबत रुग्णांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा लावून धरला. जिल्हाधिकाऱ्यांनी आयएमए पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला. तरीही, काही खासगी डॉक्‍टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

"सकाळ'ची पाहणी 
याबाबत प्रत्यक्ष स्थितीचे अवलोकन करण्यासाठी "सकाळ'च्या प्रतिनिधीने शहरातील काही रुग्णालयांमध्ये जाऊन माहिती जाणून घेतली. यामध्ये खानदेश कॉम्प्लेक्‍समधील एका रुग्णालयात गेले असता, याठिकाणी डॉक्‍टर तपासणीसाठी केवळ तासभरच उपस्थित राहत असल्याचे कळाले. रिंगरोडवरील एका त्वचारोग तज्ज्ञांच्या रुग्णालयात माहिती जाणून घेण्यासाठी गेल्यानंतर याठिकाणी सध्या डॉक्‍टर आठवडाभरातून सोमवार, बुधवार व शनिवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत येत असल्याचे समजले. भास्कर मार्केट परिसरातील एका रुग्णालयात तसेच आणखी काही रुग्णालयांमध्ये पाहणी करण्यात आली आली. यातील बहुतांश याठिकाणी डॉक्‍टर सकाळच्या सुमारास काही वेळ येत असून, रुग्ण असल्यानंतरच डॉक्‍टर तपासणीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. 

फोनवर नावनोंदणी बंद 
कोरोनाच्या हाहाकारामुळे खासगी डॉक्‍टरांनी "ओपीडी' अत्यंत कमी केली असून, त्यांच्याकडून रुग्णांची तपासणी देखील केली जात नाही. पूर्वी प्रत्येक रुग्णालयात तपासणी अगोदर रुग्णाची फोनवरून नावनोंदणी केली जात होती. मात्र, आता कुठल्याच रुग्णालयात नावनोंदणी केली जात नसून, ती बंद करण्यात आली असल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 
 
सहाय्यक डॉक्‍टरांकडून तपासणी 
खासगी रुग्णालयात डॉक्‍टरांची तपासणी सुरू आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी "सकाळ' प्रतिनिधीने स्वतः रुग्ण बनून खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन त्या ठिकाणावरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यातून अत्यंत गंभीर रुग्ण असेल, तरच मुख्य डॉक्‍टर तपासणीसाठी येतात. अन्यथा, सहाय्यक डॉक्‍टरच रुग्णाची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. 

डॉक्‍टरांनी ठरवली ओपीडीची वेळ 
शहरातील रिंगरोडवरील महेश चौकातील एका प्रतिष्ठित डॉक्‍टरकडे नावनोंदणी केल्यानंतर दोन दिवसानंतर रुग्णाची तपासणी केली जाते. परंतु, या रुग्णालयाबाहेर रुग्णालय प्रशासनाकडून ओपीडी 9 ते 1 या वेळेतच होईल, अशा आशयाचा फलक लावल्याचे दिसले. असेच फलक अन्य डॉक्‍टरांनी लावले असल्याचे पाहणीत दिसून आले. रुग्णांपेक्षा डॉक्‍टरच "पॅनिक झाल्याचे त्यांच्या या रुग्णसेवे?वरून दिसून येत आहे. 

काय मिळाली उत्तरे? 
- अर्जंट असेल तरच डॉक्‍टर तपासतील. 
- ओपीडीची वेळ बदलली आहे, नंतर या. 
- फक्त सकाळीच तपासणी होईल. 
- डॉक्‍टर उपलब्ध नाहीत, सहाय्यक डॉक्‍टर तपासतील 
 
रुग्णांची अनावश्‍यक गर्दी टाळण्यासाठी खासगी रुग्णालये ठराविक वेळेतच सुरू ठेवावी, असे शासनाचे निर्देश आहेत. शिवाय, कोणत्याही रुग्णालयात गंभीर, अतिगंभीर रुग्णांची तपासणी वेळीच केली जात आहे, त्या तपासणीला टाळण्याचे कारणच नाही. मात्र, अशा स्थितीत नियमित तपासणी करायला येणारे रुग्णही भरपूर असून, ते कोणाचेही ऐकून घ्यायला तयार नाहीत. "कोरोना' संसर्गाचा धोका सर्वत्र कायम आहे. कोणता रुग्ण अशाप्रकारच्या "व्हायरल इन्फेक्‍शन'ने ग्रस्त आहे, हे समजणे कठीण असताना डॉक्‍टरांनी व त्यांच्या सर्व स्टाफने जीव धोक्‍यात का घालावा? तरीदेखील रुग्णांची तपासणी ठराविक काळासाठी सुरू ठेवण्याच्या सूचनेचे पालन केले जात आहे. 
- डॉ. स्नेहल फेगडे, सचिव, आयएमए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com