सकाळ ब्रेकिंग ; डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाचा डॉक्‍टर कोरोना बाधित ;महिलेच्या संपर्कात लागण; पार्टीमुळी वाढली भीती; 16 विद्यार्थी क्वारंटाईन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसह उत्तीर्ण विद्यार्थी, शिकाऊ डॉक्‍टर्स आणि महाविद्यालयीन शिक्षक स्टॉफची एकत्रित जंगी पार्टी (गेट-टू-गेदर) होऊन जेवणावळीत हा बाधित डॉक्‍टर विद्यार्थी सहभागी झाल्याची माहितीही समोर आली आहे, त्यामुळे वैद्यकीय वर्तुळात संसर्गाची मोठी भीती व्यक्त होत आहे. 
 

जळगाव, ता.12 : जळगाव खुर्द येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ऍप्रेंटीशीप करणाऱ्या शिकाऊ डॉक्‍टर विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली. या विद्यार्थ्यासोबतच्या 16 शिकाऊ डॉक्‍टरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालय म्हणून अधिग्रहित केले असल्याने एका महिला रुग्णाच्या संपर्कात आल्याने या शिकाऊ डॉक्‍टरला बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, हा बाधित डॉक्‍टर रविवारी कॅम्पसमध्ये झालेल्या पार्टीत सहभागी झाल्यानेही संसर्गाची भीत वाढली आहे. 

जळगाव खुर्द येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर विद्यार्थी कोरोना बाधित महिला रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला लागण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दोनशेचा आकडा गाठत असतानाच शिकाऊ डॉक्‍टरला लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगाव शहरात कोव्हीड बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने गेल्या महिन्यातच शहरातील जिल्हा रुग्णालय कोव्हीड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले व जळगावचे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे स्थलांतरित करण्यात आले होते. जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना तपासणीसाठी याच रुग्णालयात पाठवण्यात येत असून शासकीय जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा स्टाफ या ठिकाणी कार्यरत आहे. 

बाधित महिलेच्या संपर्कात 
उपचारार्थ दाखल महिलेवर उपचार करत असताना वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ डॉक्‍टर या बाधित महिलेच्या संपर्कात आला होता. त्यानंतर सर्दी, तापाची लक्षणे जाणवू लागल्याने या डॉक्‍टरचे स्वॅब संकलित करून तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सोमवारी (ता.11) संध्याकाळी आलेल्या अहवालात या शिकाऊ डॉक्‍टरला कोविडची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील सहकारी विद्यार्थी, स्टाफ आणि डॉक्‍टरांमध्ये खळबळ उडाली. 

16 डॉक्‍टर विद्यार्थी क्वारंटाईन 
बाधित विद्यार्थी (शिकाऊ डॉक्‍टर) मूळचा साऊथ इंडियन असून तो, वैद्यकीय महाविद्यालयाच्या होस्टेलमध्येच वास्तव्याला आहे. त्याच्या सोबत होस्टेलमध्ये राहणारे आणि शिक्षण घेणाऱ्या 16 विद्यार्थ्यांना होस्टेलमध्येच क्वारंटाईन करण्यात आले आहे. एक विद्यार्थी बाधित असल्याने स्थानिक विद्यार्थी-डॉक्‍टरांनी आज रुग्णालयात दांडी मारल्याचेही वृत्त आहे. 
------ 
शनिवारी पार्टी, सोमवारी "पॉझिटिव्ह' 
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसह उत्तीर्ण विद्यार्थी, शिकाऊ डॉक्‍टर्स आणि महाविद्यालयीन शिक्षक स्टॉफची एकत्रित जंगी पार्टी (गेट-टू-गेदर) होऊन जेवणावळीत हा बाधित डॉक्‍टर विद्यार्थी सहभागी झाल्याची माहितीही समोर आली आहे, त्यामुळे वैद्यकीय वर्तुळात संसर्गाची मोठी भीती व्यक्त होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Dr. Corona of Ulhas Patil College infected; infected with a woman; Increased fear of the party; 16 student quarantine