esakal | ...तर जिल्ह्यात औषध टंचाईचे सावट !
sakal

बोलून बातमी शोधा

drugs

औषधांचा पुरवठा दोन ते तीन दिवस उशिराने येत असल्याने आगामी आठवडाभरात औषधांची टंचाई निर्माण होण्याची भिती औषध विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

...तर जिल्ह्यात औषध टंचाईचे सावट !

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सरकारने लॉकडाऊन सुरू केले आहे. या काळात सर्व दुकाने बंद असली तरी, अत्यावश्‍यक सेवा सुरळीत ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, औषध टंचाईच्या भितीपोटी उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांनी तीन महिन्यांचा साठा करून ठेवला आहे. तर दुसरीकडे औषधांचा पुरवठा दोन ते तीन दिवस उशिराने येत असल्याने आगामी आठवडाभरात औषधांची टंचाई निर्माण होण्याची भिती औषध विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू केला. यानुसार अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व उद्येाग, धंदे बंद करण्यात आले आहेत. अशात मेडिकल स्टोर्स खुले असले तरी ठिकठिकाणच्या औषधी दुकानांवर एकच झुंबड उडत आहे. जिल्ह्यात ५०० होलसेलर आणि २२०० रिटेलर असे एकूण सत्तावीसशे केमिस्ट नागरिकांना सेवा देत आहेत. औषध विक्रेत्यांकडून वारंवार सांगूनही नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने गोंधळ होत आहे. त्यात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरुग्ण दोन ते तीन महिने पुरतील इतके औषध खरेदी करुन ठेवत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात येणाऱ्या औषधींच्या वाहनांची ठिकठिकाणी चौकशी केली जात असून, त्यांना दोन तीन दिवसांचा उशिर होत असून, पुढेही लॉकडाऊन कायम राहिल्यास आठ ते पंधरा दिवसांनी तुटवडा जाणवू शकतो अशी भिती औषध विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

२० कोटींची उलाढाल
जिल्ह्यात दर महिन्याला औषध विक्रीत २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल होत असते. यात सर्व प्रकारच्या औषधांचा समावेश आहे. सध्या ओपीडीच्या औषधी, गोळ्यांसह शस्त्रक्रियांसाठी लागणारे साहित्य व प्रतिजैविक औषध खरेदीचे प्रमाण घटले आहे. साधारण तपासणी आणि शस्त्रक्रीया बंद असल्याने प्रतिजैवकांची विक्री ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. तर सरकारने सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तूच्या कक्षेत आणल्यामुळे त्याचे दर नियंत्रणात आले आहेत. तर एन-९५ मास्क, तसेच पीपी किट सरकारी दवाखान्यासाठीच ठेवले आहे.

मधुमेह, रक्तदाब रुग्णांकडून तीनतीन महिन्यांचा औषध साठा खरेदी केला जात आहे. तर औषधांचा पुरवठा करणाऱ्या वाहनांची ठिकठिकाणी तपासणी होत असल्याने जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांनी उशिराने साठा मिळत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास आठ-पंधरा दिवसात तुटवडा जाणवू शकतो. तरी नागरिकांनी औषधांना अतिरीक्त साठा करु नये, वेळेवर औषध पुरवठा केला जाईल.
- सुनील भंगाळे, जिल्हाध्यक्ष, मेडिसीन डिलर्स असोसिएशन.

loading image