esakal | खडसेंना राज्याच्या राजकारणात घेण्यास भाजप दचकते का? 
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

भाजपला मुख्यमंत्रिपदापर्यंत पोचविण्यात मोलाचे योगदान दिले होते. आता राज्याच्या राजकारणात बाजूला केल्यानंतर आक्रमक खडसेंना भाजपने केंद्रात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

खडसेंना राज्याच्या राजकारणात घेण्यास भाजप दचकते का? 

sakal_logo
By
कैलास शिंदे

"युद्धात जिंकले आणि तहात हरले' अशी स्थिती भाजपची झाली आहे. तब्बल 105 आमदार असतानाही पक्षाला सत्ता गमावून विरोधी पक्षात बसावे लागले आहे; तर अवघे दोनअंकी संख्येचे आमदार असलेले तिन्ही पक्ष आज सत्तेत आहेत. संघाच्या शिस्तीतील चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाने नेतृत्व दिले; परंतु त्यांना यश आले नाही. मात्र, एकेकाळी मुंडे, खडसे, फुंडकर, दानवे या बहुजनांकडे नेतृत्व असताना त्यांनी पक्षाला सत्तेवर आणले होते.

अगदी 2014 च्या निवडणुकीत एकनाथराव खडसेंनी युती तोडण्याची घोषणा करून भाजपला मुख्यमंत्रिपदापर्यंत पोचविण्यात मोलाचे योगदान दिले होते. आता राज्याच्या राजकारणात बाजूला केल्यानंतर आक्रमक खडसेंना भाजपने केंद्रात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना त्यात रस नाही. अशा स्थितीत त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करून पक्षाला सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? भाजपचे नेतृत्व अद्याप का दचकते आहे, हाच खरा प्रश्‍न आहे. 

भाजपने 2019 ची विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून यश मिळविले. निवडणुकीनंतर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत चर्चा करण्यास भाजपचे चाणाक्ष नेतृत्व कमी पडले. वास्तविक, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या "रेशमबागे'तील संघाच्या पठडीत तयार झालेले नेतृत्व आहे. चंद्रकांत पाटील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. "आम्हीबी घडलो... तुम्हीबी घडाना' हे शाखेतील गीत आहे. "बिघडवायचे नाही तर घडवायचे' ही त्यांची शिकवण आहे. मग, हीच शिकवण राजकारणाच्या सत्तेच्या "सारीपाटी'त हे दोन्ही नेते कसे विसरले? त्यामुळे आज 105 आमदार असतानाही पक्षाला विरोधी पक्ष म्हणून फिरावे लागत आहे. 

भाजपच्या राज्यातील उभारणीत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे मोलाचे योगदान आहे. त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन ग्रामीण भागातील युवक शिवसेनेकडे वळला होता. महाजन- मुंडेंनी शिवसेनेशी युती करून राज्यात भाजप वाढविला, असे आजही बोलले जाते. त्यावेळी युतीच्या या दोन्ही पक्षांनी रस्त्यावर आंदोलनाच्या माध्यमातून कॉंग्रेसला घेरले. 1995 च्या निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीने मोठे यश मिळवीत सत्ता संपादन केले. नंतर थेट पंधरा वर्षे शिवसेना- भाजपला सत्तेवर येण्यासाठी वाट पाहावी लागली होती. या पंधरा वर्षांत भाजपने पुन्हा संघटनात्मक मोट बांधली. 2009 ते 2014 या काळात आघाडी सरकारला नामोहरम करून सोडले. सोबतीला मोदी लाट होतीच. भाजपची स्वबळाची तयारीही सुरू झाली. खडसेंनी नेतृत्वाला राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष राहील, अशी हमी दिली. युतीबाबत कोणतीही घोषणा करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांची असते; परंतु त्यावेळी पक्षाने विरोधी पक्षनेते खडसे यांच्यावर ही जबाबदारी दिली. शिवसेनेशी युती तुटली; परंतु आता त्याच पक्षाविरुद्ध निवडणुकीत सामना करावयाचा होता. खडसेंनी काही कॉंग्रेसजणांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत भाजपने तीन अंकात प्रवेश करीत तब्बल 122 जागा जिंकत राज्यात क्रमांक एकचा पक्ष झाला. 

विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्रिपदाची संधी असते, त्यानुसार खडसे यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. केंद्रीय नेतृत्वाने त्यांना संधी नाकारली. त्यामुळे त्यांची नाराजी असणे साहजिकच होते; परंतु त्यांना मंत्रिमंडळात बारा खाती देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यांना मंत्रिमंडळातून जावे लागले. विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे उमेदवारी नाकारली. विधानसभा निवडणुकीत भाजपला यावेळी तब्बल 105 जागा मिळाल्या. विशेष म्हणजे, यावेळी युतीतर्फे लढत देण्यात आली होती. मात्र, भाजपच्या राज्य नेतृत्वात चाणाक्षपणाचा अभाव असल्याने चर्चेअभावी मित्रपक्ष शिवसेना दूर गेला आणि भाजपच्या सत्तेची संधीही हुकली. 
दुसरीकडे पक्षाच्या या भूमिकेविरुद्ध खडसेंनी वेळोवेळी आवाज उठविला. यादरम्यान पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना राज्यसभेवर घेण्याची तयारी केली होती. मात्र, खडसेंनी आपल्याला केंद्रात रस नसल्याचे स्पष्ट करून राज्यात सक्रिय राहणार असल्याचे सांगितले होते. 

आज राज्यातील भाजपच्या नेतृत्वाची स्थिती पाहता, सर्वांत मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात आहे. चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु त्यांना अपेक्षित यश येत नाही. उलट त्यांच्यावर "बुमरॅंग' होत आहे. अशा स्थितीत खडसेंना जर राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्यात रस आहे, त्यांना राज्यात सक्रिय केले, तर निश्‍चित पक्षाला ताकद मिळेल. तरीही त्यांना राज्यात सक्रिय करून घेण्यास घोडे अडलेय कुठे? खडसे राज्याच्या नेतृत्वात सक्रिय झाल्यास आपले नेतृत्व खुजे होईल, अशी सध्याच्या नेतृत्वाला भीती वाटते आहे का? पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र उत्तराच्या प्रतीक्षेत निश्‍चित आहेत. 
 

loading image