जळगाव जिल्ह्यात "सारी'चा पहिला बळी 

अमोल कासार
मंगळवार, 12 मे 2020

शहरातील दीक्षितवाडी परिसरातील 63 वर्षीय वृद्धाला काही दिवसांपासून श्‍वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना एक मेस कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी या रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले.

जळगाव : जिल्ह्यात "कोरोना'च्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच आता "सारी' आजाराने डोके वर काढले असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असलेल्या एका 63 वर्षीय वृद्धाला "सारी'ची लागण झाल्याचे आढळून आले. दरम्यान, उपचार सुरू असताना आज या वृद्धाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात "सारी'चा पहिला बळी गेल्याने प्रशासन हादरून गेले आहे. 
शहरातील दीक्षितवाडी परिसरातील 63 वर्षीय वृद्धाला काही दिवसांपासून श्‍वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना एक मेस कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी या रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. दोन दिवसानंतर या रुग्णाचा कोव्हिडचा अहवाल "निगेटिव्ह' आला होता. मात्र, त्यांना तरी देखील श्‍वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांच्यावर कोव्हिड रुग्णालयात उपचार सुरू होते. या वृद्धाचा अहवाल "निगेटिव्ह' आल्यानंतर देखील त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या मुलाकडून डॉक्‍टरांना विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी त्या वृद्धास डबल न्यूमोनिया झाल्याचे सांगून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली. 

खासगी रुग्णालयांचा उपचारास नकार 
"कोरोना'चा अहवाल "निगेटिव्ह' आल्यानंतर देखील त्या वृद्धाला त्रास जाणवत होता. त्या वृद्धाच्या मुलाने वडिलांची प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. परंतु शहरातील प्रतिष्ठित खासगी रुग्णालयांनी त्या रुग्णावर उपचार करण्यास नकार दिल्याने या वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाने केला. 

..यासाठी उपचारासाठी नकार 
वडिलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या मुलाने शहरातील सर्व प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारणा केली. यावेळी हॉस्पिटलसह डॉक्‍टरांकडून अगोदर कुठे उपचार सुरू आहेत, याबाबत विचारणा केली. कोव्हीड रुग्णालयाचे नाव सांगताच सर्व डॉक्‍टरांनी उपचार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती मृत वृद्धाच्या मुलाने दिली. 

कोव्हीड रुग्णालयाने दिला "सारी'चा अहवाल 
"त्या' मृत वृद्धाचा अहवाल "निगेटिव्ह' आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्या वृद्धावर "सारी' व "न्यूमोनिया'चे निदान केले जात होते. याबाबतच अहवाल देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृताच्या कुटुंबीयांना दिला होता. खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या वृद्धाला "सारी3 असल्याचे सांगून शहरातील खासगी रुग्णालयांनी नकार दिल्यानेच त्या वृद्धाचा मृत्यू झाला. 

काय आहे "सारी' 
"कोरोना' आणि "सारी'ची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. "सारी'ग्रस्त व्यक्तीची श्‍वासोच्छ्वास घेण्याची गती अर्थात रेस्पारेशन रेट 45 प्रती मिनीट असते. श्‍वास घेताना हा रुग्ण धापा टाकतो. व्हायरल आणि बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन हे सारीचे मूळ आहे. फुफ्फुसांत सूज येणे, कमी काळात रुग्ण अत्यवस्थ होणे ही "सारी'ची प्रमुख लक्षणे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon first death sari virus