esakal | अधिकाऱ्यांची पाझरली माणूसकी...110 परंप्रातीय कामगारांना मिळाला निवारा ! 
sakal

बोलून बातमी शोधा

अधिकाऱ्यांची पाझरली माणूसकी...110 परंप्रातीय कामगारांना मिळाला निवारा ! 

जळगाव जिल्ह्यातून अनेक कामगार त्यांच्यागावाकडे जाण्यासाठी पायी निघाले होते. ही बाब तालुका प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अगोदर पायी झुंडीने जाणाऱ्या 25 जणांना बोलावून त्यांना त्यांच्या गावी न जाण्याचा सल्ला दिला.

अधिकाऱ्यांची पाझरली माणूसकी...110 परंप्रातीय कामगारांना मिळाला निवारा ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : "कोरोनो'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश, जिल्हा लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत अनेक कामगार त्यांच्या प्रांताकडे निघाले होते. जळगावमधून राष्ट्रीय महामार्गाने जाणाऱ्या तब्बल 110 कामगारांच्या राहण्याची, भोजनाची सोय प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठ्यांनी केली आहे. या कामगारांना येथे राहण्यासाठी सुविधा देण्यावर प्रशासन रात्रंदिवस जागून त्यांना भोजन, इतर सुविधा देण्यावर भर देत आहे. 

जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये मॅरेज हॉल बेघर, रस्त्यावर फिरणाऱ्यांसाठी ताब्यात घेण्याच्या सूचना प्रांताधिकारी, तहसीलदारांना केलेल्या आहेत. त्यानुसार प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे यांनी राधाकृष्ण मंगल कार्यालय, लांडवंजारी मंगल कार्यालय अधिग्रहीत केले आहे. 

जळगाव जिल्ह्यातून अनेक कामगार त्यांच्यागावाकडे जाण्यासाठी पायी निघाले होते. ही बाब तालुका प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अगोदर पायी झुंडीने जाणाऱ्या 25 जणांना बोलावून त्यांना त्यांच्या गावी न जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या निवाऱ्याची, भोजनाची, इतर वस्तू देण्याची सोय केली. नंतर त्यांच्यासोबत आणखी काही कामगार त्यांच्यागावाकडे जाणार होते त्यांनाही याठिकाणी आणून त्यांची सोय केली आहे. आता दोन्ही मंगल कार्यालयात 110 कामगार आहेत. त्यातील काही सुरत, नाशिक, उत्तराखंड, यू.पी., झारखंडचे रहिवासी आहेत. 

मदतीचा वर्षाव... 
मजुरांची राहण्याची सोय झाली. त्यांना नगरसेवक अशोक लाडवांजरी, सुनील माळी यांनी अंघोळाचे किट दिले आहे. गजानन मालपुरे यांनी शंभर लोकांना जेवण उपलब्ध करून दिले आहे. महसूल कर्मचारी संघटनेने ब्लॅंकेट, चादरी दिल्या. विवेकानंद नगरातील स्थानिक नागरिकांनी ब्लॅंकेट, अंघोळीचे किट दिले. नाथ फाउंडेशन यांनी ब्लॅंकेट, शाल चादर दिली. नियाजअली फाऊंडेशनतर्फे गहू, तांदूळ, अंघाळीचे कीट देवून मदत केली आहे. 

मंडलाधिकारी योगेश नन्नवरे, मेहरूणचे तलाठी सचिन माळी, शहर तलाठी रमेश वंजारी हे 24 तास मंगल कार्यालयात थांबून कामगारांना सुविधा देत आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये मंगल कार्यालये अधिग्रहीत करून परगावी जाणाऱ्या कामगारांची राहण्याची सोय केली आहे. काही सामाजिक संस्थांनी त्यांना भोजन दिले, अंघोळीचे कीट दिले. कामगारांची बाहेर न पडता तेथेच राहावे यासाठी कामगारांचे प्रबोधन करीत आहेत. 

तहसीलदार वैशाली हिंगे.