esakal | सत्तेचा डाव मांडण्यासाठी गिरीश महाजनांची मुंबईवारी 
sakal

बोलून बातमी शोधा

girish mahajan

शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकार आहे. "लॉकडाउन' आणि राज्यातील "कोरोना' संसर्गाशी लढा देण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात शासन यशस्वीपणे काम करीत आहे.

सत्तेचा डाव मांडण्यासाठी गिरीश महाजनांची मुंबईवारी 

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार बनण्याचा पेच दिवसेंदिवस बिकट होत आहे. अशा स्थितीत भाजपही राज्यात सरकार बनविण्याची संधी शोधत असल्याची चर्चा असून, त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे "संकटमोचक' व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईवारी केली असल्याची जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या गोटात चर्चा सुरू आहे. 

हेपण वाचा - Video एमआयडीसी ठाण्यासाठी "टिकटॉक सिंघम'ची निवड!; निरीक्षकाच्या व्हायरल व्हीडीओची चर्चा


शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकार आहे. "लॉकडाउन' आणि राज्यातील "कोरोना' संसर्गाशी लढा देण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात शासन यशस्वीपणे काम करीत आहे. विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असलेल्या निर्णयाबाबत राज्यातील जनताही समाधानी असल्याचे सागंण्यात येत आहे. या शिवाय ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील विविध पक्षाचे मंत्री या "लॉकडाउन'च्या काळात योग्य निर्णय घेऊन समन्वयाने काम करीत आहेत. त्यामुळे जनतेत सध्या तरी सरकारबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आता तांत्रिक पेचात सापडण्याची शक्‍यता आहे. त्यांचे विधान परिषदेवर आमदार बनण्याबाबतची समस्या निर्माण होण्याची शक्‍यता असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु सत्ताधारी तीनही पक्ष त्याबाबत आता सावधानतेने पावले उचलत असूनही "कोरोना'चे संकट असताना राज्यावर शासन बदलायची वेळ येऊ नये, यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच मुख्यमंत्री ठाकरे यांचा आमदार बनण्याचा मार्गही सुकर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आमदार बनण्याच्या तांत्रिक मुद्यात सरकार पडल्यास नवीन सरकार बनविण्यासाठी विरोधी भाजप तयार असल्याचेही सांगण्यात येत आहे. "कोरोना'चे संकट असतानाच मध्यप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार खालसा करून भाजपने आपले सरकार स्थापन केले. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ही संधी मिळण्याची शक्‍यता पक्ष शोधत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी भाजपच्या वरिष्ठ राजकीय स्तरावर अंतर्गत "डाव' मांडणी सुरू असल्याची चर्चा आहे. अगदी याचसाठी पक्षाचे "संकटमोचक' म्हणून काम केलेले गिरीश महाजन यांनीही मुंबईवारी केल्याचे चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. जामनेर येथून महाजन मुंबई येथे गेले ते तब्बल सात दिवस मुंबईत ठाण मांडून असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणी पक्षाच्या काही वरिष्ठांशी चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विधानपरिषदेवर आमदार करण्यास मान्यता दिली नाही. तर उद्‌भवणाऱ्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. 
आता राज्यातील नवीन राजकीय पेचात संधी शोधत असलेल्या भाजपला सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी महाजन यांचीही "नीती' कामात येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. गिरीश महाजन यांच्या मुंबईवारीबाबत अद्यापही संभ्रमच आहे. त्याबाबत कोणालाही माहिती नव्हते. मात्र, त्यांच्याच जामनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन हे मुंबईला गेल्याने त्यांना "क्वारंटाइन' करून त्यांची तपासणी करावी, असे पत्र जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना दिले. त्यामुळे त्याच्या या राजकीय डाव मांडणीचीही राजकीय चर्चा सुरू झाली आहे. परंतु याबाबत भाजप गोटातून कोणताही दुजोरा मिळालेला नाही. 

राजकीय भाष्य नाहीच 
गिरीश महाजन मात्र सध्या जामनेर येथेच आपल्या निवासस्थानी आहेत. त्यांनी रविवारी (ता.26) जळगाव येथे येऊन महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाची पाहणी केली, तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्याशी चर्चा करून "कोरोना'संशयितांच्या होत असलेल्या विलंबाबाबत नाराजीही व्यक्त केली.तसेच बाजार समितीतील फळ बाजारात होत असलेल्या गर्दीबाबत तीनही फळ बाजार वेगवेगळे भरविण्यबाबत त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याशीही चर्चा केली. मात्र कोणतीही राजकीय चर्चा मात्र त्यांनी केली नाही. त्यांच्याशी संपर्क साधला असताना कोणतेही राजकीय भाष्य करण्यासही त्यांनी नकार दिला.