सोन्यात गुंतवणुकीची "गोल्डन' संधी 

gold
gold

जळगाव : "कोरोना व्हायरस'सह विविध कारणांमुळे सोन्याच्या भावात चार दिवसांत 1900 रुपयांची घसरण झाली. सोन्याच्या भावातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. सध्या सर्वत्र मंदीचे वातावरण असताना सोन्यात आज केलेली गुंतवणूक उद्याच्या भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर व सुरक्षित ठरू शकेल, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. 
वर्षभरातील एकूणच भाववाढ झाली ती प्रत्येक वेळी वेगवेगळ्या परिस्थितीतून. कधी अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थिती, कधी "कोरोना व्हायरस', कधी सतत रुपयाचे डॉलरच्या तुलनेत होणारे अवमूल्यन, तर कधी लग्नसराईमुळे सोन्याला वाढती मागणी अशा अनेक गोष्टी सोन्याचे भाव सतत वाढण्यास कारणीभूत आहेत. "कोरोना व्हायरस'मुळे जी जागतिक आर्थिक अस्थिरता निर्माण झाली, त्यामुळे सोन्याचे भाव खूपच जास्त प्रमाणात वाढले. 
सोने म्हणजे दागिन्यांच्या रूपात हौस पूर्ण होते आणि परिस्थितीनुरूप कधीही पैशांची गरज भासल्यास ग्राहक तत्काळ सोने मोडून आपली गरज भागवू शकतो. भविष्यातील तरतूद म्हणून सोन्यात गुंतवणूक केव्हाही चांगली असते. यामुळे नागरिक एक ग्रॅमपासून तोळ्यापर्यंतच्या सोन्याची खरेदी दरमहिन्याला करतात. जेणे करून मुला-मुलींच्या लग्नावेळी, त्यांच्या शिक्षणावेळी सोने मोडून रोख रक्कम हातात येऊ शकेल, यादृष्टीने मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबातील नागरिक सोन्यात गुंतवणूक करतात. 
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात वाढ होत गेली. मात्र, चार दिवसांपूर्वी 44 हजार 300 रुपये प्रतितोळा असलेले सोने आज 42 हजार 400 वर येऊन ठेपले. सुवर्ण बाजारात गेल्या तीन महिन्यांपासून सोन्याचे भाव वाढतच होते. त्या अनुषंगाने डिसेंबरपर्यंत ते प्रतितोळा 50 हजारांपर्यंत पोहोचेल, असा आशावाद सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. 

ग्राहकांना सुरक्षित गुंतवणुकीची संधी 
अजय ललवाणी (संचालक, महावीर ज्वेलर्स) ः
सोन्यातील गुंतवणूक केव्हाही सुरक्षित असते. सोन्याच्या भावात उच्चांक आला होता. मात्र, आता सोन्याचे भाव कमी झाल्याने सोन्यात गुंतवणुकीची संधी ग्राहकांच्या हातात आहे. आजची गुंतवणूक उद्याच्या भविष्यात नक्कीच वाढावा देणारी असेल. त्यामुळे सोन्यात सर्वांनीच गुंतवणूक करावी. 
 
सोन्यातील गुंतवणुकीतून चांगला परतावा 
मनोहर पाटील (व्यवस्थापक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स)
ः सोन्यात गुंतवणूक करणारा ग्राहक निश्‍चिंत असतो. "मी कोणत्याही भावात सोने खरेदी केले, तरी भविष्यात ती फायद्याची गुंतवणूक ठरणार आहे, हे ग्राहक समजून असतात. आता तर सोन्याच्या भावात घट झाली आहे. भाव कमी झाल्याने सोन्यात गुंतवणुकीला मोठी संधी आहे. या गुंतवणुकीतील परतावा इतर कोणत्याही गुंतवणुकीत शक्‍य नाही. 
 
सोन्यातील गुंतवणूक सोनेच देणार 
भागवत भंगाळे (संचालक, भंगाळे गोल्ड)
ः कोणत्याही गुंतवणुकीत दोन पैसे मिळावेत, म्हणून ग्राहक गुंतवणूक करतो. सोन्याचे भाव आता कमी झाले आहेत. त्याला विविध कारणे आहेत. सोन्यात भावात तेजी येताना ते कमीही झाले, ही ग्राहकांसाठी गुंतवणुकीची उत्तम संधी आहे. पुढे सोन्याच्या भावात वाढ होईल, ते त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. 
 
ग्राहकांचा फायदाच! 
किरण पातोंडेकर (संचालक, पातोंडेकर ज्वेलर्स) ः
विविध कारणांमुळे सोन्याचे भाव वाढले होते. मात्र, सध्या त्यात घसरण झाली. वास्तविक सोन्याचे भाव वाढले पाहिजे होते. भाव कमी होणे ग्राहकांसाठी फायद्याचेच असते. आताची सोन्यातील गुंतवणूक ग्राहकांना भविष्यात फायदेशीर ठरेल. सोमवारनंतर सोन्याचे भाव निश्‍चित होतील. 

वर्षभरातील सोन्याचे भाव (प्रतितोळा, "जीएसटी'विना रुपयांत) 
14 एप्रिल 2019--32 हजार 200 
15 मे 2019--32 हजार 800 
15 जून 2019--33 हजार 500 
15 जुलै 2019--34 हजार 900 
15 ऑगस्ट 2019--38 हजार 
15 सप्टेंबर 2019--37 हजार 700 
15 ऑक्‍टोबर 2019--38 हजार 800 
15 नोव्हेंबर 2019--38 हजार 600 
15 डिसेंबर 2019--38 हजार 300 
15 जानेवारी 2020--40 हजार 100 
15 फेब्रुवारी 2020--41 हजार 400 
15 मार्च 2020--41 हजार 600 
 
गेल्या पाच दिवसांतील भाव (प्रतितोळा रुपयांत) 
10 मार्च--44 हजार 300 
11 मार्च--44 हजार 300 
12 मार्च--44 हजार 000 
13 मार्च--43 हजार 500 
14 मार्च--42 हजार 400 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com