शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी... केळी विकास महामंडळ स्थापनेला हिरवा कंदील! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

केळी विकास महामंडळ स्थापण्यासाठी विद्यापीठ प्रतिनिधी व केळीवरील संशोधकांकडून महत्त्वपूर्ण "डेटा' जमा करण्याचे काम आगामी काळात केले जाईल.

जळगाव  : जिल्ह्यात केळी प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. यामुळे जिल्ह्यात केळी विकास महामंडळाची स्थापना करण्याबाबत मी सकारात्मक आहे. लवकरच महामंडळ स्थापण्याबाबत राज्यभरातील केळी संशोधकांकडून माहिती घेतली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हा केळीचा "हब' आहे. यामुळे जिल्ह्यात केळी विकास महामंडळाची स्थापना व्हायला हवी, असा प्रस्ताव कृषिमंत्री भुसे यांच्याकडे पाठविला होता. त्यास मंत्री भुसे यांनी हिरवा कंदील दिला आहे. केळी विकास महामंडळ स्थापण्यासाठी विद्यापीठ प्रतिनिधी व केळीवरील संशोधकांकडून महत्त्वपूर्ण "डेटा' जमा करण्याचे काम आगामी काळात केले जाईल. महामंडळातर्फे केळी उत्पादकांना न्याय मिळेल. त्यांना विविध प्रकारची उत्पादने तयार करून त्यास राज्य, देशपातळीवर महत्त्वाचे स्थान मिळविता येणार आहे. केळीवर विविध प्रकारचे संशोधन, टिश्‍युकल्चर रोपे तयार करणे, केळीची विविध प्रकारची तपासणी आदी बाबी एकाच छताखाली करता येणार आहे. 

जळगावला केळी विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव आजच कृषी विभागातर्फे राज्याच्या सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. त्यात मंत्रिमंडळात चर्चा होईल. त्यानंतर महामंडळ स्थापण्यासाठी हालचाली होतील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Green light for establishment of Banana Development Corporation