फडणवीस मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत : गृहमंत्री अनिल देशमुख  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

राज्यातील "कोरोना'ची परिस्थिती राज्य सरकार चांगल्या पद्धतीने हाताळत आहे. राज्यात टेस्टिंगची संख्याही वाढविली आहे. त्यामुळे रुग्णांचीही संख्या वाढली. मात्र मुंबई पुण्याहून मजूर परतत असल्यामुळे ग्रामीण भागातही संख्या वाढली आहे.

जळगाव : राज्यात "कोरोना'ची गंभीर परिस्थिती आहे, अशा काळात सरकारच्या हातात हात घालून विरोधी पक्षाने काम करण्याची गरज आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते मात्र सरकारला अडचणीत आणण्याचे काम करून "मुंगेरीलाल के हसीन सपने' पाहत आहेत. असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 

जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील उपस्थित होते. गृहमंत्री देशमुख म्हणाले, की राज्यातील "कोरोना'ची परिस्थिती राज्य सरकार चांगल्या पद्धतीने हाताळत आहे. राज्यात टेस्टिंगची संख्याही वाढविली आहे. त्यामुळे रुग्णांचीही संख्या वाढली. मात्र मुंबई पुण्याहून मजूर परतत असल्यामुळे ग्रामीण भागातही संख्या वाढली आहे. सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ती निश्‍चित नियंत्रणात येईल असा विश्‍वासही आहे. 

विरोधकांकडून राजकारण 
आजची परिस्थिती गंभीर असल्यामुळे सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून देशमुख म्हणाले, विरोधक मात्र राजकारण करीत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. 

फडणवीसांचे हसीन सपने 
राज्यातील "कोरोना'ची गंभीर स्थिती असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी हे राज्य शासनाची अनुकूल भूमिका घेत आहेत. त्यामुळे आपण त्यांचे अभिनंदन करतो. मात्र गेली पाच वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे आज विरोधी पक्ष नेते सरकारला अडचणीत आणून मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत. या नेत्यांनी गडकरी यांच्याकडून अडचणीच्या काळात सरकारशी कसे वागावे हे शिकले पाहिजे. असा टोलाही फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. 

गोयलांकडून फजिती करण्याचा प्रयत्न 
केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावरही मंत्री देशमुख यांनी टीका केली, ते म्हणाले, केंद्रीय मंत्री गोयल हे सुद्धा राजकारण करीत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. पश्‍चिम बंगालमध्ये वादळ आल्यामुळे तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे गाड्या सोडू नये अशी विनंती केली. अशा स्थितीत गोयल यांनी एका रात्री तब्बल 41 रेल्वे गाड्या सोडण्याचे शेड्यूल राज्य शासनाला दिले. म्हणजे राज्य शासनाची फजिती करण्याचाच प्रयत्न गोयल करीत असल्याचे दिसून येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon home minister anil deshmukh fadanvis target