परिचारिकेचा विनयभंग "टिकटॉक'वर व्हिडिओ केला अपलोड

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

नंदुरबार तालुक्‍यातील रहिवासी असलेली पीडिता शहरातील एका वसतिगृहात वास्तव्यास आहे. तिच्यासोबत रुग्णालयात कार्यरत वॉर्डबॉय आणि रिसेप्शनिस्ट गेल्या काही दिवसांपासून तिची छेडछाड करीत आहे. नाईट ड्यूटीला असताना सोबत काम करताना या-ना त्या प्रकारे या नर्सला छेडण्याची एकही संधी जाऊ देत नाही.

जळगाव : शहरातील रिंगरोड येथील एका खासगी रुग्णालयात कार्यरत 25 वर्षीय परिचारिकेचा (नर्स) वॉर्डबॉय व रिसेप्शनिष्ट यांनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला. काही दिवसांपासून तिघेही या तरुणीला त्रास देत होते. मात्र, दुर्लक्ष केल्याने तिघांची हिंमत वाढून चक्क त्यांनी तिच्या नावानेच टिकटॉक व्हिडिओ करून त्याचा स्टेटस एकाने ठेवला.

पीडितेने घडल्या प्रकरणाची जिल्हापेठ पोलिसांत तक्रार दिल्यावरून विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंगरोडवरील एका खासगी रुग्णालयात परिचारिका (नर्स) म्हणून पीडित तरुणी 2015 पासून कार्यरत आहे. मूळ नंदुरबार तालुक्‍यातील रहिवासी असलेली पीडिता शहरातील एका वसतिगृहात वास्तव्यास आहे. तिच्यासोबत रुग्णालयात कार्यरत वॉर्डबॉय आणि रिसेप्शनिस्ट गेल्या काही दिवसांपासून तिची छेडछाड करीत आहे. नाईट ड्यूटीला असताना सोबत काम करताना या-ना त्या प्रकारे या नर्सला छेडण्याची एकही संधी जाऊ देत नाही. वारंवार घडणाऱ्या प्रकारामुळे त्रासून तिने रुग्णालयाच्या व्यवस्थापकांकडे तिघांची तक्रारही केली होती. मात्र, त्यांच्यावर वेळीच कारवाई झाली नाही. परिणामी, तिघांची हिंमत वाढत जाऊन अमीर तडवी, प्रदीप पाटील यांनी चक्क तिच्या नावाने गाण्याचा व्हिडिओ शूट करून "टिकटॉक' ऍपवर अपलोड केला. हा व्हिडिओ रिसेप्शनिष्ट गौरव सुरळकर याने त्याच्या व्हॉटस्‌अप स्टेटसला ठेवला. आज सकाळी तिच्या मैत्रिणीने फोन करून पीडितेला कळविले. तिने व्हिडिओ पाहिल्यावर धक्‍काच बसला. सकाळी कामावर आल्यावर परत तिने तिघांची तक्रार केली. काम करत असताना एकाने अश्‍लाघ्य शेरेबाजी केल्याने पीडितेने अखेर पोलिस ठाण्याचा रस्ता धरला. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन तिघांविरुद्ध रीतसर तक्रार दिल्यावरून ठाणे अमंलदार जितेंद्र सुरवाडे यांनी पीडितेची तक्रार नोंदवून घेतली. 

विनयभंगासह आयटी ऍक्‍ट 
पीडितेने दिलेली तक्रार आणि सोशल मीडिया ऍप्लिकेशन टिकटॉक व व्हॉटस्‌ऍप याच्यावर व्हिडिओ अपलोड केल्याने अमीर तडवी, प्रदीप पाटील, गौरव सुरळकर या तिघांविरुद्ध विनयभंग आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अकबर पटेल तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon hospital nurse tiktok video