esakal | सौम्य लक्षण आढळल्यास गृह विलगीकरण 
sakal

बोलून बातमी शोधा

सौम्य लक्षण आढळल्यास गृह विलगीकरण 

मृत्युदर कमी करण्यासाठी सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांची लवकर ओळख होऊन त्यावर उपचार होणे आवश्यक आहे. संपर्क साखळी तातडीने शोधण्यावर आणि स्वॅब तपासणी वाढविण्यावर भर द्यावा. 

सौम्य लक्षण आढळल्यास गृह विलगीकरण 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार  ः कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांची इच्छा असल्यास आणि त्याच्या निवासस्थानी तशा सुविधा असतील, तर त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले. 

कोरोनाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. डॉ. भारुड म्हणाले, की जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी यासाठी नियमावली तयार करावी. गृह विलगीकरणापूर्वी आरोग्य पथकाने बाधिताच्या घरी आवश्यक सुविधा असल्याची खात्री करून घ्यावी. त्याच्या घरच्यांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात. विलगीकरणासाठी घरात पुरेशी जागा असल्याची खात्री करून घ्यावी. गृह विलगीकरण ही ऐच्छिक बाब असेल. गृह विलगीकरणापूर्वी संबंधितांकडून त्याची इच्छा असल्याबाबत लेखी निवेदन घ्यावे. 


तालुक्याच्या यंत्रणेने बाधिताच्या संपर्कातील अधिक आणि कमी जोखमीच्या सर्व व्यक्तींचे स्वॅब तातडीने घ्यावेत. तळोदा आणि नवापूरच्या टीमने याबाबत विशेष दक्षता घ्यावी. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आवश्यक सुविधांची निर्मिती करावी. ज्या गावात कोरोनाबाधित आढळला त्याच्या परिसरातील गावातही लक्षणे असलेल्या व्यक्तींबाबत माहिती घेतली जावी. मृत्युदर कमी करण्यासाठी सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांची लवकर ओळख होऊन त्यावर उपचार होणे आवश्यक आहे. संपर्क साखळी तातडीने शोधण्यावर आणि स्वॅब तपासणी वाढविण्यावर भर द्यावा. 

खांडबारा येथे दोन टप्प्यांत प्रत्येकी ४० अशा ८० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करावे. तालुका नियंत्रण कक्षांनी तालुका स्तरावर स्वॅब घेण्याबाबत योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. एकूण बाधितांच्या संख्येच्या तुलनेत संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीचे प्रमाण वाढवावे. नवापूर येथे कोविड केअर सेंटरबाबत मनुष्यबळाचे योग्य नियोजन करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सांगितले. बैठकीस सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्याधिकारी, पालिका मुख्याधिकारी उपस्थित होते. 


संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top