ज्वारी, मका खरेदीची ऑनलाइन नोंदणी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मे 2020

जळगाव जिल्ह्यात ज्वारी व मका खरेदीसाठी 17 केंद्रांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंजुरी दिली. त्या अनुषंगाने मार्केटिंग फेडरेशनने आजपासून ज्वारी व मका खरेदी ऑनलाइन नोंदणी सुरू केली. ज्या खरेदीदार संस्था आहेत त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी नोंदणी करायची आहे.

भडगाव : शासनाने ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने मार्केटिंग फेडरेशनने ज्वारी व मका खरेदीची नोंदणी आजपासून सुरू केल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी परिमल साळुंखे यांनी सांगितले. "सकाळ'ने ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र, शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात ही खरेदी केंद्र सुरू व्हावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 
जळगाव जिल्ह्यात ज्वारी व मका खरेदीसाठी 17 केंद्रांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंजुरी दिली. त्या अनुषंगाने मार्केटिंग फेडरेशनने आजपासून ज्वारी व मका खरेदी ऑनलाइन नोंदणी सुरू केली. ज्या खरेदीदार संस्था आहेत त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी नोंदणी करायची आहे. त्यासाठी रब्बी हंगामात ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर ज्वारी वा मका नोंद असलेला उतारा, आधार कार्ड, बॅंकेचे पासबुक लागणार आहे, असे फेडरेशनचे अधिकारी साळुंखे यांनी सांगितले. या नोंदणीबाबत संबंधित शेतकरी सहकारी व इतर संस्थांना कळविण्यात आल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्‍यातील खरेदी केंद्र असणाऱ्या संस्थांकडे नोंदणी करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांनी नोंद केल्यानंतर माल खरेदी करण्यात येईल, असेही श्री. साळुंखे यांनी सांगितले. 

जिल्ह्यात 17 ठिकाणी होणार खरेदी 
जळगाव जिल्ह्यात 17 ठिकाणी ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यात जळगाव येथे जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेत, यावल येथे कोरपावली वि. का. सोसायटी लि., बोदवडला बोदवड को.-ऑप. परचेस युनियन लि. संस्थेत, तर अमळनेर, पारोळा, भडगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा येथे शेतकरी सहकारी संघात ही खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या केंद्रावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. दरम्यान अनेक ज्वारी व मका उत्पादक शेतकरी हे खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे त्यांनी आपला माल विक्री केलेला नाही. त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

खरेदीसाठी ज्या संस्थांची नियुक्ती केली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. त्यासाठी रब्बी ज्वारी व मका या पिकांची नोंद असलेला तलाठ्यांकडील सही-शिक्‍क्‍याचा ऑनलाइन सातबारा उतारा, आधारकार्डची झेरॉक्‍स व बॅंक पासबुकची झेरॉक्‍स नोंदणीसाठी आवश्‍यक आहे 
- परिमल साळुंखे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jowar and corn kharedi online ragistretion